आभाळमाया – सौरसंकुलाचे भ्रमण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वैश्विक , [email protected]

उत्तरायण गेल्या 21 तारखेला सुरू झाले. म्हणजे तो आपल्या दृष्टीने सर्वात ‘लहान’ दिवस होता. आमच्या खिडकीतून मुंबईतही छान सूर्योदय दिसतो आणि रोज नव्या उत्सुकतेने अवकाशातील या तेजोनिधीचं दर्शन मी रोज घेतो ते त्याचं उत्तर-दक्षिण असं आणि दक्षिणोत्तर भासमान भ्रमण नोंदण्यासाठी. पृथ्वीच्या कलत्या अक्षामुळे वर्षभरात पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा सूर्य पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण गोलार्धात अधिक काळ प्रकाशणारा किंवा अधिक काळाच्या अंधाराची अनुभूती येते. त्यालाच आपण दिवस लहान-मोठा होणे असं म्हणतो.

सूर्याचं हे भासभान भ्रमण वर्षभरात आपल्याला इंग्लीश ‘आठ’ या आकडय़ासारखे भासते. याचाच अर्थ पृथ्वी सेकंदाला सुमारे तीस किलोमीटर वेगाने सूर्याभोवती आपल्याला हा विभ्रम दाखवते. अवकाशातील या सर्वच वस्तूंच्या गती अचाट, अफाट आहेत. आपण सेकंदाला तीस किलोमीटर वेगाने अवकाशात फिरतोय त्याची जाणीव आपल्याला होतच नाही. आपल्याला आपण ‘स्थिर’ आहोत असं वाटतं. ते आपल्यापुरतं खरंच असतं. पण वैश्विक परिमाणात ते निराळं ठरतं. गेल्या 21 तारखेला पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात तीन महिने (सप्टेंबर ते डिसेंबर) जास्तीत जास्त वेळ तेजाळणारा सूर्य त्याच्या अविष्टंम किंवा ‘विंटर सॉल्टाईस’ बिंदूवरून पुन्हा उत्तरेकडे निघाला. दक्षिण गोलार्धातला तो सर्वात मोठा तर उत्तर गोलार्धात आपल्यासाठी सर्वांत लहान असणारा दिवस सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी उगवला आणि संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी (मुंबईत) मावळला. विविध गावात, शहरात ही वेगवेगळी असते हे लक्षात ठेवायला हवं.

अवकाशात पृथ्वी सूर्याभोवती, चंद्र पृथ्वीभोवती आणि सर्व ग्रहसुद्धा सूर्याभोवतीच फिरतात. त्यांचा सूर्याभोवती फिरण्याचा वर्षकाळ निरनिराळा असतो. एक गंमत अशी की, शुक्र ग्रह सूर्याभोवती त्याच्या स्वतःभोवती भ्रमणाच्या काळापेक्षा कमी काळात फिरतो! याचाच अर्थ शुक्राचं वर्ष त्याच्या दिवसापेक्षा लहान असतं! सूर्याभोवती सर्व धुमकेतूही फिरताना आपण पाहतो. अवकाशात इतस्ततः फिरणारे महापाषाण (ऍस्टेरॉईड्स) सूर्याभोवतीच फिरतात. नुकताच 23 डिसेंबरला असा एक महाकाय महापाषाण पृथ्वीच्या जवळून गेला. काही फिरस्ते महापाषाण पृथ्वीसाठी भयावह असू शकतात. मात्र ते मुख्यतः फिरतात सूर्याभोवतीच. एवढंच काय पूर्वी एका लेखात वाचल्याप्रमाणे चंद्रही मुलतः सूर्याभोवतीच फिरतो. पृथ्वी वजा केली तरी चंद्र थोडी कक्षा बदलून सूर्याभोवतीच फिरत राहील.

आता एवढा सारा पसारा आपल्याभोवती फिरत ठेवणारा सूर्य तरी स्थिर असतो का? बिलकूल नाही! तो तर अतिप्रचंड म्हणजे सेकंदाला सुमारे 250 किलोमीटर वेगाने, आपल्या सर्व ग्रहसंकुलासह अवकाशात फिरत आहे. कशाभोवती फिरतोय हा सूर्य? आपल्या आकाशगंगेच्या (मिल्की वे) मध्यभागी एक अतिप्रचंड गुरुत्वाकर्षण असलेलं विशाल कृष्णविवर आहे. तेच आपल्या आकाशगंगेचे केंद्र. त्याभोवती आपला सूर्यच नव्हे तर इतर सर्व आकाशगंगेचे घटक असलेले तारे आणि त्यांच्या सभोवती असलेले (किंवा असले तर) ग्रह या विशाल कृष्णबिवराला परिक्रमा करत आहेत.

आपला सूर्य इतर अनेक ताऱयांप्रमाणेच एक सामान्य तारा आहे. तो वैश्विक परिणामानुसार. आपल्यासाठी मात्र जनक (पेरेन्ट) तारा आहे. त्याचा ‘जन्म’ सुमारे पाच अब्ज वर्षांपूर्वी झाला. त्याचं वय एकूण 10 अब्ज वर्षांचं आहे. याचा अर्थ सूर्य पन्नाशी उलटून आता ‘पोक्त’ मध्यमवयीन झाला आहे. त्याला ग्रहमालेचा ‘संसार’ आणि पाच अब्ज करायचाय. साधारण साडेचार अब्ज वर्षांनी त्याचं वृद्धत्व सुरू होईल. त्याच्या गाभ्यातली ऊर्जा मंदावायला लागेल. त्याचं गुरुत्वाकर्षण तसंच राहिलं तर त्याचं आकारमान वाढेल. तो लाल महातारा होईल. त्याच्या या प्रसरणात मंगळापर्यंत सारे ग्रह समाविष्ट होतील. पृथ्वीवरचं जीवन त्यापूर्वीच प्रखर उष्णतेने नष्ट झालेलं असेल.

सूर्याचा व्यास पृथ्वीच्या 110 पट आहे तर गुरु 11 पट इतके म्हणजे युरेनस नेपच्यून यांच्यापर्यंतचे सारे ग्रह आणि त्यापलिकडचा ऍस्टेरॉईड्सचा (महापाषाणाचा) पट्टासुद्धा घेऊन सूर्य आपल्या आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती अव्याहत फिरत आहे. आता प्रश्न असा की, गेल्या पाच अब्ज वर्षांत सूर्य आकाशगंगेच्या केंद्रकाभोवती फिरायला किती वेळ घेतो? तासाला सुमारे 7 लाख किलोमीटर या वेगाने फिरणारी सौरमाला इतक्या वर्षात आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवराभोवती नेमकी किती वेळा फिरली असेल ते अगदी योग्य आकडय़ात सांगणं तसं कठीणच.

तरीसुद्धा आताच्या अत्याधुनिक गणक पद्धतीने काढलेलं सौरसंकुलाच्या परिक्रमेचं 5 अब्ज वर्षांतील गणित अवघ्या 20 परिक्रमांचं आहे. याचाच अर्थ आपलं सौरसंकुल महाकाय कृष्णविवराभोवती 25 कोटी वर्षांत एक परिक्रमा पूर्ण करत असतं. अशा अतिशय विस्मयकारी वाटणाऱया गोष्टी आपल्या नकळत, आपल्याच बाबतीत घडत असतात. आपण अवकाशात सेकंदाला सुमारे 250 किलोमीटर वेगाने फिरतो ते वेगवान पृथ्वी आणि सूर्यामुळेच!