
>> वैश्विक
माहितीचं कोठार असलेल्या ‘नेट’वर आपल्याला रोज काहीतरी नित्यनवीन पाहायला- ऐकायला मिळतं. त्यातून बरंच ज्ञान मिळतं हे खरं असलं तरी अनेकदा मनात संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्याही अगदी सचित्र प्रसिद्ध होत असतात. काही चित्रं कोडय़ाच्या स्वरूपात असतात, ती दृष्टिभ्रम निर्माण करतात, पण त्यातलं अपेक्षित चित्र ओळखण्यात मेंदूला चालना तरी मिळते. काही बाबतीत मात्र उगाचच भरपूर चर्चाचर्वण घडत जातं. पृथ्वीवरच्या अनेक ‘गूढ’ विषयांवरची वृत्तं तर सारखीच येत असतात, पण आता अंतराळही त्यातून सुटलेलं नाही.
काही वेळा ‘फॅन्टॅसी’ किंवा अद्भुत कथा म्हणून अशा गोष्टी लिहिल्या, वाचल्या, पाहिल्या जातात. मात्र त्यातली कथा काल्पनिक आहे याची जाणीव वाचणाऱ्याला किंवा त्यावरचा चित्रपट पाहणाऱ्याला असते. हॉलीवूडच्या चित्रपटातले ‘एलियन’ किंवा ‘परग्रहवासी’ त्यांनी पडद्यावर दाखवले तसेच कसे दिसतात याला उत्तर नाही. तो त्यांचा कल्पनाविलास म्हणून मान्य होतो. ‘एलियन’ किंवा ‘इन्डिपेन्डन्स डे’सारख्या चित्रपटातले ते पृथ्वीबाहेरून आपल्या ग्रहावर नजर ठेवतात किंवा थेट आक्रमणच करतात असं सगळं प्रभावी मांडणी आणि उत्तम अभिनय आविष्कारात पाहताना खरं वाटलं तरी ते तसं नाही याचीही जाणीव सुज्ञ अंतर्मनात कुठेतरी असते. त्यामुळे चित्रपटीय किंवा कथानकातल्या फॅन्टॅसींची गोष्ट वेगळी.
तरीसुद्धा त्याचा प्रभाव पडतोच. एच.जी.वेल्स यांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘द लिटल ग्रीन मेन’ या मंगळावर राहणाऱ्या बुटक्या सजीवांची कथा जेव्हा (1930 च्या दशकात) अमेरिकन रेडिओवरून क्रमशः वाचली जात होती तेव्हा अनेक श्रोते भयभीत झाले होते आणि खरंच एक दिवस ते मंगळवासी आपल्यावर आक्रमण करतील असं त्यांना वाटू लागलं होतं.
तीच गोष्ट उडत्या तबकडय़ांची. वास्तविक बहुतेक वेळा या ‘तबकडय़ा’ अमेरिकेतच कशा दिसतात हे एक कोडंच, पण विचार केला तर समोर आलेल्या संकल्पनेत वाहत जायचं ठरवलं तर कोण काय करणार? आमच्या आकाशदर्शन कार्यक्रमातल्या प्रश्नोत्तरांच्या तासाच्या पूर्वी बराच वेळ अशा फॅन्टॅसी प्रश्नांना उत्तर देण्यात जायचा आणि मूळ खगोलशास्त्राविषयी प्रश्न बाजूला राहायचे. बरं, नुसतीच चर्चा, निष्पन्न काहीच नाही. त्यामुळे त्यावर निदान त्या कार्यक्रमात चर्चा नको असं ठरलं. एरवी त्याबाबतची वैज्ञानिक सत्य अभ्यासू मंडळी सांगायची.
असे अनेक भ्रम, संभ्रम सर्वसामान्यांच्या मनात तयार होतात, ते साहजिकच आहे. उदाहरणार्थ, चंद्रावर दिसणारं हरीण किंवा ससा यांची कथा आमच्या बालपणी चांगलीच प्रचलित होती. कारण तसं आधीच सांगितलं असेल, म्हणजे त्या प्रकारे मन तयार (कन्डिशन्ड) केलेलं असेल तर पाहणाऱ्याला ‘तसंच’ दिसतं. आम्हालाही चंद्रावर हरीण, ससा वगैरे दिसायचे तेव्हा त्याचं कुतूहल असायचं, आता हसू येतं.
हे सगळं आठवण्याचं आणि आपल्या अवकाशयानांच्या मालिकेत हा विषय आणण्याचं कारण म्हणजे अमेरिकेने मंगळावर पाठवलेल्या क्युरिऑसिटी यानाने घेतलेला मंगळपृष्ठावरचा एक फोटो 7 मे 2022 रोजी क्युरिऑसिटी यानाने नॅसाकडे एक फोटो पाठवला. त्यात मंगळपृष्ठावरच्या कडेकपारीत एक ‘डोअर वे’ दिसत होता. मंगळपृष्ठ बरंचसं पृथ्वीसारखंच आहे. मात्र तिथे पाणी आणि वनस्पती नसल्याने ते उजाड, रखरखीत दिसतं. पाणी कुठे असलेच तर ध्रुवीय बर्फात किंवा मंगळ पृष्ठभागाखाली खोलवर. तर नॅसाने (नासा) प्रसिद्ध केलेल्या त्या फोटोतला मंगळाच्या खडकाळ भागातला तो ‘दरवाजा’ म्हणजे तिथल्या प्राचीन संस्कृतीचा पुरावा आहे का? पूर्वी तिथे प्रगत सजीव, स्थापत्यशास्त्र वगैरे होतं का? नसेल तर खडकात हा ‘दरवाजा’ कसा? वगैरेची उत्सुकता (क्युरिऑसिटी) वाढवणारी चर्चा जोर धरू लागली. मुळात हा कथित दरवाजा आहे अवघा 12 इंच उंचीचा आणि 16 इंच रुंदीचा. ‘क्लोजअप’ फोटोत तो कितीही विस्तारित दाखवता येतो. एवढय़ावरून तिथे बांधकाम होतं वगैरे म्हणजे सुतावरून स्वर्गाला जाण्यासारखंच, पण असं घडण्याची ही पहिली वेळ नव्हे. मंगळावरचाच एक विशाल चेहरा (फेस) पूर्वी प्रसिद्ध झाला होता!
मंगळाच्या सायडोनिया या भागातील उंचसखल खडकाळ पृष्ठभागाचे फोटो 1976 च्या जुलैमध्ये व्हायकिंग – 2 यानाने घेतले आणि त्यावेळी मंगळाच्या उत्तर गोलार्धातील सपाट मैदानी भागावरच्या एका खडकाचा आकार मानवी ‘चेहऱ्या’सारखा दिसला. त्यावर लगेच मंगळावर एकेकाळी प्रगत सजीव होते अशी जोरदार चर्चा रंगली. अखेरीस ऍटेन्डेस आणि बॅम्बर्ग या विवरांच्या सीमेवरील खडकाचा आकार त्या फोटोत केवळ छायाप्रकाशाच्या खेळामुळे दिसत होता हे सिद्ध झालं आणि ‘मंगळा’चा चेहरा हरवला! पण आता तिथे कल्पनेचा दरवाजा उघडलाय. चालायचंच, विज्ञान जाणून घेताना अशाही गमतीजमती घडतात!


























































