ठसा – उद्धव भवलकर

>> ऍड. अभय टाकसाळ

डाव्या चळवळीमध्ये एक कार्यकर्ता घडायला त्याच्या नेतृत्वात बदल व्हायला, जडणघडणीला, सामाजिक मान्यता मिळायला अनेक वर्षे लागतात. एखाद्या नेत्याच्या पोटी जन्माला येऊन आयतं नेतृत्व मिळणं डाव्या चळवळीत जमत नाही. अनेक वर्षांच्या या प्रक्रियेतून अनेक वर्षांचा संयम, तडफ, समर्पण, संघर्ष करून तयार झालेले नेतृत्व अचानक जाणे डाव्या चळवळीला परवडण्यासारखे नाही. उद्धव भवलकरांच्या अचानक जाण्याने मराठवाडय़ातील कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडय़ात विशेषतः औद्योगिक वसाहतीत त्यांच्या कार्याचा अमिट असा ठसा आहे.

12 मार्च 1952 रोजी धाराशीव जिल्हा वाशी तालुक्यातील लाखनगाव येथे शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या उद्धव भवलकरांवर बालपणात त्या भागातील शेकापच्या डाव्या विचारांचा प्रभाव पडत होता. त्यांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षण येरमळा येथील निवासी शाळेत झाले. कळंबला आणीबाणीच्या काळात त्यांनी स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली. एम.एस्सी. शिक्षण घेत असताना मराठवाडा विकास आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला. माजी खासदार गंगाधरअप्पा बुरांडे यांनी त्यांचे आंतरजातीय लग्न लावले. त्यांच्याच मार्गदर्शनाने कॉ. भवलकर संभाजीनगरला सीटूचे पूर्णवेळ कार्यकर्ते झाले.

स्वतंत्रपणे, निर्भीडपणे धोका पत्करत काम करण्याच्या हातोटीने त्यांनी कमी काळात संभाजीनगर व जालना औद्योगिक वसाहतीत सीटूचा जम बसवला. कॉ. छगन साबळे, कॉ. दामोदर मानकापे, कॉ. लक्ष्मण साप्रूडकर या विश्वासू सहकाऱयांना पूर्णवेळ कार्यकर्ते करून संघटनेची पकड निर्माण केली. शेतकरी-शेतमजुरांच्या लढय़ावरही लक्ष दिले. स्वतंत्रपणे कार्य करण्याच्या पद्धतीने त्यांच्यावर टीका व्हायची. पण लढाऊ नेता म्हणून कामगार त्यांच्याकडे आकर्षित व्हायचे. अनेक कारखान्यांत त्यांनी यशस्वीपणे लढा देऊन तडजोडी करीत कामगारांना वेतनवाढ मिळवून दिली. असंघटित क्षेत्रातील कामगार, बांधकाम मजूर, घरकामगार, ऊसतोडणी मजूर यांनाही वेळ दिला. मराठवाडय़ाच्या आर्थिक, नोकरी आणि सिंचनाच्या अनुशेषाबद्दलही ते पोटतिडकीने बोलायचे.

1986-87 दरम्यान त्यांच्यावर एकदा प्राणघातक हल्लाही झाला. त्यातूनही ते बचावले. पण त्यांनी कामगारांसाठीचा आक्रमक पवित्रा सोडला नाही. युनिव्हर्सल लगेज या पैठण औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या कामगार लढय़ात कंपनी व्यवस्थापक पुरी यांच्या खून खटल्यातून कामगारांना निर्दोषमुक्त करण्यासाठी त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ऍड. कॉ. मनोहर टाकसाळ यांचे या सर्व संकटकाळात भक्कम पाठबळ असल्याने त्यांचे काम वाढत गेले. लाल, निळा, भगवा, तिरंगी इ. सर्व झेंडे एकत्रितपणे कामगारांसाठी लढा देतायेत, अशा एकसंध लढा देणाऱया संयुक्त कामगार कृती समितीचे ते निमंत्रक होते. कॉ. भालचंद्र कांगो, साथी सुभाष लोमटे, बुद्धिनाथ बराळ, कॉ. भीमराव बनसोड, कॉ. राम बाहेती, एस. ए. गफ्फार, के. एन. थिगळे, प्रभाकर मते पाटील, रंजन दाणी आदी सहकाऱयांसोबत संभाजीनगरच्या रस्त्यांवर कामगारांच्या प्रश्नांवर विविध रंगांचे झेंडे हजारोंच्या संख्येने आपण पाहिले आहेत. त्याची मोट बांधण्याचे काम निमंत्रक म्हणून कॉ. भवलकरांनी केले.

त्यांच्या कार्यपद्धतीतूनच सीटू भवनची इमारत उभी राहिली. 40-50 वर्षांच्या तुफानी संघर्षातून निर्माण झालेला कॉम्रेड अचानक शांत होणे धक्कादायक आहे. त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे घेऊन जाणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

आपली प्रतिक्रिया द्या