अलौकिक श्रीसंतदर्शन : कवी मोरोपंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक दिगंबर वैद्य

संतवृत्तीतून प्रकट झालेले अजरामर काव्य निर्माण करणाऱया पंतकवी मोरोपंताचा परिचय करून देणारा ‘स्मरण’लेख.

वैशाख वणव्याने धरित्रीच्या तप्त देहाची लाहीलाही होत असताना अवचितपणे आभाळ भरून येते, अन् निमिषार्धात अनावर पावसाचा प्रसन्न शिडकावा धरणीला अंतर्बाह्य तृप्त करतो. अनाहूत पावसाच्या ‘आवेग’सरींनी मातीमाय मोहरते, बावरते अन् तिच्या अंग-प्रत्यांगातून दरवळणाऱया मनमोहक मृदगंधाने चराचर सृष्टी भारावून जाते. लतावेलींची सलज्ज कुजबूज, पक्ष्यांचा किलबिलाट अन् निळ्या आकाशात उगवलेल्या इंद्रधनुष्याचे सप्तरंगी ओघळ आपल्या पिसाऱयावर तोलून घेत ‘मोर’ नाचू लागतो. आकर्षक पदन्यासावर स्थिरावलेला त्याचा सहस्त्रनेत्रांचा पिसारा आणि अधूनमधून तीव्रतेने उमटणारा त्याचा ‘केका’ हे दृश्य अनुभवणाऱया अनेकांची नजरबंदी करतो.

हे सृष्टी‘वैभव’ सांगण्याचे औचित्य, निसर्गातील स्थित्यंतराचा अनुभव ज्या प्रतिभावंताने साहित्यविश्वास मिळवून दिला अन् आपल्या जन्मजात काव्यप्रतिभेवर ‘शब्द’वैभवाचा डौलदार पिसारा तोलून धरण्याची किमया केली त्या मोरोपंतकवींचे स्मरण करण्यामागे आहे. रसिकमनाला आपल्या काव्यरचनेच्या मोहिनीने खुणावणारे कवी ‘मोरोपंत’ सदैव काव्यप्रतिभेच्या तेजाने तळपले, शारदेच्या प्रांगणात त्यांची स्मृती ‘मोरपिसाची खूण’ होऊन राहिली. म्हणूनच, कवीजनांच्या मांदियाळीत मोरोपंतांचे स्थान निर्विवाद श्रेष्ठ आहे हे दाखविण्यासाठी ‘सुश्लोक’ वामनाचा, ‘अभंगवाणी’ प्रसिद्ध तुकयाची। ‘ओवी’ ज्ञानेशाची किंवा ‘आर्या’ मयूरपंतांची। ही यथार्थ रचना पुरेशी आहे.

कोकणातील ‘सौंदळ’ गावी तैलबुद्धीचा पारंपरिक वारसा जपणाऱया पराडकर कुटुंबातील रामजीपंत नोकरीच्या निमित्ताने पन्हाळगडावर स्थायिक झाले. सन 1729 मध्ये, रामजीपंताचे नातू रामचंद्रपंत यांच्या पोटी मोरोपंतांचा जन्म झाला. त्यांचे न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र वेदांत आणि साहित्य या विषयीचे रीतसर शिक्षण गणेश आणि केशव पाध्ये या दोन विद्वानांपाशी झाले. कोल्हापूर येथे छत्रपतींच्या चाकरीत असलेल्या रामचंद्रपंतांची नेमणूक बारामती येथे झाली तेव्हा मोरोपंत त्यांच्या वयाच्या 24 व्या वर्षी बारामतीस गेले आणि अखेरपर्यंत तेथेच राहिले. दैववशात त्यांचा परिचय पेशव्यांचे साहुकार आणि बारामतीचे सरंजामदार बाबूजी नाईक यांच्याशी झाला. बाबूजींनी मोरोपंतांना पुराणिकपदी आश्रय दिला आणि त्यासोबतच कऱहा नदीकाठचा वाडादेखील बहाल केला. याच वाडय़ामध्ये मोरोपंतांनी 268 काव्यकृती, 108 रामायणे, 60 हजार आर्या आणि 75 हजाराहून अधिक श्लोक, स्तोत्रे, आख्याने आणि काही ‘गझल’रचनाही केल्या.

बालपणापासून विविध पुराणांचे आणि आख्यानांचे वाचन, कीर्तन-प्रवचनांचे आकर्षण अशा उत्तम संस्कारातून घडलेल्या मोरोपंतांना ‘आर्या’वृत्ताने जबरदस्त मोहिनी घातली. ‘आर्या’वृत्त त्यांच्या काव्यलेखनाचे अविभाज्य अंग बनले. 17 हजार आर्यांनी रचलेले ‘आर्याभारत’ महाकाव्य हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ‘महाभारत’ या आर्ष महाकाव्याचा रसाळ अनुवाद आणि ‘राधासुता, तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म?’ असा रोखठोक सवाल विचारणारा श्रीकृष्ण आर्यावृत्ताची वेगळीच गोडी अन् खुमारी वागवीत वाचकांना नादावता झाला. आर्यामुक्तमाला, आर्याकेकावली, कृष्णविजय, हरिवंश, मंत्र भागवत, कुशलवोपाख्यान, प्रल्हादविजय, नाममाहात्म्य, नारदाभ्युगम, सीतागीत, भीष्मभक्तिभाग्य, संशय-रत्नावली, परमेश्वरस्तोत्र अशी अपरंपार ‘सकस’ ग्रंथरचना पुढे मोरोपंतांच्या हातून निर्माण झाली.

नाशिक येथील काळाराम मंदिरास वारंवार जाणारे मोरोपंत ‘प्रखर’ रामभक्त होते. त्यांच्या ‘एकशे आठ रामायणे’ तसेच मंत्र रामायण, सार रामायण या उत्स्फूर्त ग्रंथरचनांद्वारे त्यांनी आराध्यदैवत प्रभू रामचंद्रांच्या चरणांवर साहित्यसुमने उधळली आहेत. दैनंदिन व्यवहारात पूजादी नित्यकर्मे, विष्णूसहस्रनामपाठ, श्रीमद्भगवद्गीता वाचनाचा परिपाठ असलेल्या मोरोपंतांनी साध्यासोप्या, सहज गुणगुणता याव्या आणि चटकन लक्षात राहाव्या अशा आशयघन, दर्जेदार काव्याची अविरत निर्मिती केली. पुराणकथन, कीर्तन-प्रवचन-निरूपण यांकडे विशेष ओढा असलेल्या मोरोपंतांनी अखंड वाचन आणि लेखनसेवेचे व्रतदेखील नित्यनेमाने जोपासले.

विनम्र, परोपकारी आणि सत्शील स्वभावी मोरोपंत अध्यात्माचे गाढे अभ्यासक असले तरीही त्यांचे पांडित्य आणि विद्वत्ता काव्यातून प्रकटतांना क्लिष्ट आणि दुर्बोधता मिरवत आली नाही. सहजसोपी शब्दकळा आणि माधुर्य हा त्यांच्या काव्याचा स्थायिभाव होता आणि त्याला कारणीभूत ठरली ती त्यांच्याठायी वसलेली संतवृत्ती. अध्यात्म तळागाळापर्यंत पोहोचविणाऱया मोरोपंतांच्या काव्यनिर्मितीचा परमोच्चबिंदू म्हणजे त्यांनी रचलेली ‘केकावली’. उन्हाच्या झळांनी देह पोळून जात असताना आकाशमेघाकडे पाण्याच्या थेंबासाठी टाहो फोडणाऱया मोराचा ‘केका’ हा या ‘केकावली’चा गाभा होता. खरेतर हे काव्यरूपक होते. जगन्नियंत्या परमेश्वराने, सावळ्या घननिळ्याने निजकृपेचा अमृतवर्षाव करावा म्हणून मोरोपंतांसारख्या सर्जनशील सरस्वतीपूजकाने, शरणागत भक्तांच्या वतीने फोडलेला काव्यरुपी टाहो म्हणजेच ‘केकावली’. कल्पना विलास आणि दीर्घ समास ही अंगभूत वैशिष्टय़े असणाऱया केकावलीमध्ये भावरस व उत्कटतेचा अप्रतिम मिलाफ झालेला दिसतो. मोरोपंतांचे बुद्धिवैभव, भाषेवरील त्यांची हुकूमत व भावव्याकुळ करणारी हुकमी शब्दकळा यांचा अप्रतिम संगम म्हणजे ‘केकावली’. या ग्रंथाद्वारे मोरोपंत आणि त्यांच्या ‘केकावली’सह ‘मोर’ हा दिमाखदार पक्षीही साहित्यात अजरामर झाला.

दरम्यान, बाबूजी नाईकांची जहागिरी लयास गेली तेव्हा त्याची झळ मोरोपंतांनाही लागली. हे वृत्त कळताच पुण्यश्लोक अहिल्याबाई आणि श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी मोरोपंतांना राजाश्रय देऊ केला मात्र संतहृदयी मोरोपंतांनी बारामती येथेच वास्तव्य करणे स्वीकारले.

अशातच, पुढे साहित्यक्षेत्रात अनेक बदल होत गेले, नवसाहित्याची नवी परंपरा उद्यास आली तरीही मोरोपंतांचे काव्य टिकून राहिले ते विष्णूशास्त्राr चिपळूणकर आणि ल. रा. पांगारकर यांच्यामुळे. विष्णूशास्त्राRनी मोरोपंतांच्या काव्यनिर्मितीस लोकाभिमुख केले तर पांगारकरांनी ‘मोरोपंतःचरित्र व काव्य’ हा ग्रंथ लिहून मोरोपंतांच्या काव्यप्रतिभेची दखल ‘तथाकथित’ नवमतवादींना घेण्यास भाग पाडले.

‘सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो।’ या अजरामर श्लोकाच्या रूपाने मराठी माणसाच्या रसिक मनात आजदेखील ‘खडीसाखरी प्रासादिकता’ लाभलेली मोरोपंतांची आर्या दरवळते आहे. संततत्त्वाचा पुरस्कार आणि अनुनय करणारे मोरोपंत यांचे व्यक्तिगत आणि साहित्यिक मोठेपण जपून ठेवणे तसेच त्यांच्या काव्यवृत्तीतून उमगणारे संतप्रेम आत्मसात करणे हीच खरी त्यांच्याकरिता आदरांजली ठरेल असे मानणे हीच तुमच्या आमच्या रसिकत्वाची ‘खरी’ ओळख असेल.

– [email protected]