नियमित आरोग्य नियमित चक्र!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. सुचिता पिसाट

दर महिन्याचे ते चार दिवस सगळ्यात महत्त्वाचे. एक जागरूक, सुजाण स्त्री या मासिक चक्राची व्यवस्थित नोंद करून ठेवते. त्याबाबत सजग असते. पण बऱ्याचदा या चक्राचे गणित बिघडते आणि त्यात अनियमितता येते. काय असतील यामागची कारणं…

वाढता ताणतणाव, वेळीअवेळी खाणं, झोपेच्या चुकीच्या वेळा, जंकफूड खाणे, वाढलेले वजन, व्यायामाचा अभाव या सगळ्या गोष्टींचा परिणाम मासिक पाळीवर होतो आणि अनियमित मासिक पाळीचा त्रास सुरू होतो

जीवनशैलीत बदल झाल्याने अलीकडे मुलींना लवकर मासिक पाऴी येण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी मुलींना तेराव्या, चौदाव्या वर्षी मासिक पाळी येत होती, पण अलीकडे दहाव्या, अकराव्या वर्षीही मुलींना मासिक पाळी येते. जेव्हा पहिल्यांदा पाळी येते तेव्हा पुढील तीनचार वर्षे काही काही जणींची मासिक पाळी नियमित, तर काहींची अनियमित असते, पण त्यात काळजी करण्यासारखे काही नसते. हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या मासिक पाळीवर त्याचा परिणाम होत असतो. मोबाईल, टीव्हीमुळे मैदानी खेळ हल्ली खेळले जात नाहीत. शाळा- कॉलेज, क्लासेस, बाहेर जाण्यासाठी गाड्या या सगळ्यामूळे शारीरिक हालचाल होत नाही आणि त्याचा परिणाम मुलींच्या वजनावर होतो आणि वजन वाढते. वजन वाढल्यामुळे बऱ्याचदा संप्रेरकांचे असंतुलन होत असते. जसं मासिक पाळी चक्र सुरळीत व्हायला पाहिजे तर ती पाळी नियमित येईल, पण या गोष्टींमुळे बऱ्याचशा गोष्टी संप्रेरकांचा परिणाम होऊन मासिक पाळी अनियमित होते. जेव्हा संप्रेरके असंतुलीत होतात तेव्हा ही पाळी अनियमित होऊन एक महिना, दोन महिने पुढे असे व्हायला लागते. अनेक मुली पिझ्झा, बर्गर, ग्रिल्ड सॅण्डविच, पेस्ट्री, केक, चॉकलेट, कोल्ड ड्रिंक्स भरपूर खातात. काही जणी नियमित तर काही जणी दोन दिवसातून एकदा खातात. यामध्ये मैदा जास्त असतो. त्यामुळे त्यांचे वजन भरपूर वाढून हे शरीरातील संप्रेरक असंतुलित होतात.

पॉलिसिस्टिक ओक्हरियन डिसीज (पीसीओडी)

अनियमित पाळी येण्याचे पीसीओडी हे प्रमुख लक्षण आहे. शरीरातील मासिक पाळीच्या चक्राची घडी बसल्यानंतर म्हणजे तरुण वयात पाळी अनियमित होण्याचे सर्रास दिसणारे कारण म्हणजे ‘पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज’. यात ओव्हरीजवर लहान लहान ‘सिस्ट’ म्हणजे गाठी येतात. स्त्रीबीजनिर्मितीच्या प्रक्रियेतील दोषांमुळे असे होऊ शकते. यामुळे संप्रेरकांच्या पातळीत असंतुलन होऊन बीजनिर्मिती अनियमित होते किंवा ती होतच नाही. याचाच परिणाम म्हणून मासिक पाळी अनियमित होते. यात मुलींचे वजन काढू लागते, चेहऱ्याकर मुरुमे येऊ लागतात. हनुवटी किंवा ओठांवरती लवदेखील वाढू शकते. डोक्यावरचे केस गळू लागतात.   बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढते वजन, मूल होण्याचे पुढे गेलेले वय ही कारणे बहुतेक जणींच्या ‘पीसीओडी’मागे दिसतात. थायरॉईडही त्यात येऊ शकतो.

गोळ्यांची शरीराला सवय नको

बऱ्याच जणी एखादी गोळी माहीत पडल्यास डॉक्टरांकडे न जाता थेट केमिस्टकडे जाऊन घेतात. ज्यांना पहिल्यापासूनच अनियमित पाळी आहे त्यांनी अशा प्रकारच्या गोळ्या घेऊन ते चक्र आणखी अनियमित करू नये. अगदीच खूपच महत्त्वाची गोष्ट असेल आणि ती करणे गरजेचेच आहे अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घ्याव्यात. डॉक्टर तुम्हाला नीट कोणती गोळी कधी घ्यायची ते व्यवस्थित सांगतात. गरज असेल तरच गोळ्या घ्या. त्याची शरीराला सवय लावू देऊ नका. ती अजिबात चांगली नाही. पाळी नियमित येण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्वाचे चुकीच्या खाण्याच्या पद्धती, वेळी अवेळी झोपणे या चुकीच्या पद्धंतींमध्ये बदल करायला हवा. त्यासाठी वजन आटोक्यात ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी नियमित व्यायाम करणे, वेळेवर झोपणे, घरचे जेवण जेवणे आवश्यक आहे. जवळचे अंतर पायी जाणे या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मासिक पाळी लवकर येते

मासिक पाळी ही साधारण बाराव्या-तेराव्या वर्षी येते, पण आता आपण बघतो की, अनेक मुलींना दहाव्या-अकराव्या वर्षात मासिक पाळी येते. त्याचं पण कारण हेच असावं. तुम्ही बघायला गेलात तर अलीकडे आठ-नऊ वर्षांच्या मुलीदेखील मोठय़ा वाटतात, त्यांचे वजन वाढलेलं असतं. कारण त्यांचं पौष्टिक खाणं होत नाही. त्यामुळे लहान वयात वजन वाढलेलं असतं. जेव्हा असं होतं तेव्हा साधारण मासिक पाळी लवकर येते. म्हणून आधी बारा ते चौदामध्ये पाळी यायची. आता दहा ते अकरामध्ये पाळी येते.

पाळीदरम्यान होणारी पोटदुखी

मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास महिलांसाठी एक गंभीर समस्या बनते… खासकरून हा त्रास कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना मानसिक आणि शारीरिक पातळीकर नकोसा ठरतो. पण पाळीदरम्यान ओटीपोटात दुखणं हे सर्वसामान्य लक्षण आहे. अशुद्ध रक्त बाहेर येत असल्याने बऱ्याचदा ओटीपोटात दुखते. पहिल्या दिवशी त्या क्रॅम्पमुळे दुखतं त्यात काळजी करण्यासारखे काही नाही. काहींना पोटात दुखते, काहींचे हातपाय दुखतात तर काहींची कंबर दुखते तेव्हा त्यांना पाळी येण्याचे ते चिन्ह असल्याचे समजते. पण ही पोटदुखी सहन करण्यापलीकडे असल्यास डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे. अन्यथा ती एक सर्वसामान्य बाब आहे.

या गोष्टींकडे लक्ष द्या

  • मुलगी वयात आल्यावर आईने पाळीबाबत तिला समजावून सांगायला हवे. पाळी म्हणजे काय असते, ती आल्यावर काय करायला पाहिजे, त्याला घाबरायचे नाही, पाळी महिन्यातून कधी येईल, काय वाटल्यास आईला सांगायला हवे.
  • मुलींना पाळीबाबत कल्पना दिल्यास त्या पाळी आल्यावर घाबरुन गोंधळून जाणार नाहीत.त्यासाठी त्यांना मानसिकदृष्टय़ा सक्षम करणं गरजेचे असते.
  • पाळी सुरू होते तेव्हा ती अनियमित असते. काहींना एक महिन्याने, काही जणींना दोन महिन्यांनी येते. पण साधारण सोळा-सतराव्या वर्षांपर्यंत ठीक आहे, पण तेच चक्र राहिले तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
  • पाळीदरम्यान रक्तस्राव जास्त होतोय किंवा महिन्यातून दोनदा पाळी येतेय, अशक्तपणा येतोय तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करायला हवे.
  • काही वेळा पाळी येते आणि महिना महिना अंगावरून रक्त जाते. त्यावेळी त्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते. मग आपण संप्रेरकांची तपासणी करायला हवी. अलीकडे थायरॉईडचा त्रासही मुलींमध्ये लवकर येतो. त्याकडेही लक्ष द्यायला हवे.

लेखिका स्त्रीरोगतज्ञ आहेत.