प्रासंगिक – वास्तववादी चित्रपटांचे जनक

>> प्रिया भोसले

सिनेमा हा समाजमनाचा आरसा असतो. त्या आरशात प्रेक्षकांना हवं ते दाखवून त्यात फायदेशीर ठरणारी व्यावसायिक गणितांची गुंतवणूक करण्याऐवजी भोवतालच्या परिस्थितीचं दाहक रूप दाखवून विचार करायला प्रेरित करणारे, भाबडा आशावाद न दाखवणारे मृणाल सेन इतर सिने दिग्दर्शकांमध्ये म्हणूनच फार वेगळे ठरतात. मृणाल सेन यांच्या शताब्दी वर्षा निमित्ताने.

भारताला  स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशापुढे अनेक संकटे ‘आ’ वासून उभी होती. त्यात प्रामुख्याने गरिबी, बेरोजगारीसारख्या समस्या अधिक महत्त्वाच्या होत्या. संस्थानिकांची साम्राज्ये खालसा झाली होती, परंतु उच्चवर्गीयांचे प्रभुत्व समाजावर अबाधित होते. इंग्रज गेल्यावर पण शोषित समाजाचे शोषण थांबले नव्हतेच. भारतीय सिनेमांसाठी हा काळ कोणत्याही बंधनाशिवाय आपली कलाकृती सादर करण्याचा होता. सुरुवातीच्या काळात मनोरंजन उद्योगात स्पष्ट असा फरक नव्हता. समाजमनाचा आरसा म्हणून चित्रपट निर्मितीची 1950 पासून सुरुवात झाली खरी, परंतु भांडवलशाही विरोधाच्या कथानकावर चित्रपटातही व्यावसायिक गणितांचा विचार अग्रक्रमाने केला जात होता. परिणामी विषयाला चकचकीत रूप देऊन आधी प्रस्थापितांविरुद्ध लढा देऊन मग सुखांत असा साचेबद्ध नायकप्रधान सिनेमाचा प्रवास सुरू झाला होता. अशात ऋत्विक घटक, मृणाल सेन, सत्यजित रे, शाम बेनेगलसारख्या दिग्दर्शकांनी वास्तविक जीवन, सामान्य माणसाच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या चित्रपट निर्मितीचा ध्यास घेतला होता. आयुष्य फक्त मनोरंजनपुरतं मर्यादित नसून समाजमनाची एक दुर्लक्षित बाजू, जी सिनेसृष्टीनेही बहिष्कृत केली होती, त्याचं आकर्षण त्यांना होतं. त्याच रूपात त्यांनी भारतीय शोषित वर्गाचा वेगळा ठसा वलयांकित अशा चित्रपटसृष्टीवर उमटवला.

मृणाल सेन…बंगाली समांतर सिनेमांचे जनक. 14 मे 1923 रोजी बांगलादेशातील फरीदपूर शहरात जन्मलेला हा अवलिया. विद्यार्थीदशेतच सेन कम्युनिस्ट पक्षाच्या सांस्कृतिक शाखेशी जोडले गेले होते. आयुष्य सुखांत आणि नाचगाण्यापलीकडे असण्याचे विचार दृढ होण्यासाठी रुडॉल्फ अर्नहाइमचे ‘फिल्म’ पुस्तक कारणीभूत ठरले. ते वाचून त्यांना चित्रपटांमधे रुची निर्माण झाली. त्यांच्या पहिल्या चित्रपटाला ‘रात भोरे’ला तसं यश मिळालं नाही, परंतु दुसरा सिनेमा ‘निले आकाशर’ मात्र वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आला. साम्यवादाचा संदेश देणारा सिनेमा म्हणून स्वतंत्र भारतातला हा पहिला चित्रपट होता, ज्यावर दोन महिन्यांसाठी बंदी घातली गेली. राजकीय आसूड ओढणाऱ्या ‘निले आकाशर’पर्यंत मृणाल सेन यांच्यावर हॉलीवूड सिनेमांचा पगडा होता, पण त्यानंतर आलेल्या ‘बैशे श्रावण’मधून मानवी आयुष्यावर प्रभाव असणाऱ्या भारतातील आर्थिक विषमतेवर त्यांनी ठळकपणे भाष्य केलं. भारतातील अशी अनेक खेडी आहेत, जिथे मूलभूत गरजा भागवताना निम्न वर्गाचा संघर्ष पाचवीला पुजलेला. या संघर्षात स्त्रीचं दमन, पुरुषाच्या अहंकारापायी बळी जाणारी स्त्री समाजाला नवीन नाही. पुरुषी मानसिकतेवर ‘बैशे श्रावण’ फार प्रभावीपणे ताशेरे ओढतो. ‘बैशे श्रावण’ मृणाल सेन यांच्या सिने कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या चित्रपटाने मृणाल सेन यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली.

साठच्या दशकातील सेन यांच्या चित्रपटांनी सामाजिक अस्वस्थतेसोबत त्याचा स्त्रियांवर होणारा परिणाम, स्त्रीची सोशीक प्रतिमा यांचे विविध कथानकांतून पदर उलगडून दाखवलेत. उदाहरणार्थ, ‘बैशे श्रावण’मधली नायिका किंवा ‘प्रतिनिधी’मधली नायिका या प्रतिकूल परिस्थितीमुळे आत्महत्या करतात, तर ‘आकाश कुसुम’ आणि ‘खंडहर’मधल्या नायिका पुरुषाशिवाय एकटय़ा राहतात.  चित्रपटाचा संबंध वास्तविक जीवनाशी जोडल्यामुळे प्रत्येक कथेचा शेवट  तुम्हाला अंतर्मुख करतो. याला अपवाद  1969 ला आलेला ‘भुवन शोम’चा. ‘भुवन शोम’मध्ये सेन नेहमीप्रमाणे प्रश्न उपस्थित न करता मानवी सहवासाचे महत्त्व अधोरेखित करतात. एकाकी, कठोर, शिस्तप्रिय माणसाचा आत्मशोध आणि सहवासातून बदलणारे विचार, समाजप्रिय विचारांमधे आलेली लवचिकता असा ‘भुवन शोम’चा प्रवास तुम्हाला एक सकारात्मक बाजू दाखवतो.

कधी राजकीय तर कधी सामाजिक प्रश्नांवर सेन यांनी निरंतर आपल्या चित्रपटांतून संयतपणे वाचा फोडण्याचं काम केलं, पण जगण्याच्या दृष्टिकोनातून आयुष्य त्रासदायक असताना रुपेरी पडद्यावर तेच आयुष्य पाहण्याची इच्छा फार कमी असल्यामुळे सेन यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती कमी मिळाली, परंतु पुरस्कार मात्र भरभरून मिळाले. उपलब्ध माहितीनुसार, सुमारे अठरा राष्ट्रीय आणि अनेक प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसोबत भारतीय चित्रपटसृष्टीचा मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांना मिळाला. 1923 ते 2023 हा कालखंड पाहता 2023 हे मृणाल सेन यांचं शतकपूर्ती वर्ष असल्याचं लक्षात येईल. सेन यांच्या ‘आकाश कुसुम’ची कथा नंतर अमिताभ बच्चनच्या ‘मंझिल’मध्ये, तर ‘खंडहर’ची कथा ‘खुशबू’त घेण्याचा मोह गुलजार यांना आवरता आला नाही. दोन्ही व्यावसायिक चित्रपटांचा शेवट आनंदी दाखवण्यात आला. मृणाल सेन यांना मात्र सिनेमातला सुखांत मान्य नव्हता. माणसाच्या समस्यांचं पूर्णपणे निराकरण होत नाही. त्याच्या  जगण्यातल्या विवंचना तो जिवंत असेपर्यंत सतत चालत राहणार म्हटल्यावर सुखांत मान्य नसणं हेच सेन यांचे चित्रपट सूचित करतात.

[email protected]