विज्ञान-रंजन – ‘एडिसन’चं बालगीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विनायक

साधारण पासष्ट वर्षांपूर्वी आम्हाला ‘मॉन्टेसरी’मध्ये एक ‘नर्सरी ऱ्हाइम’ किंवा बालगीत शिकवलं जायचं. आमच्या आधीच्या चार पिढय़ांपासून आजतागायत ‘फेमस’ असलेली म्हणजे ‘जॅक ऍण्ड जिल’ आणि ‘मेरी हीड अ लिटिल लॅम्ब’. … आता या गोष्टीचा, विख्यात संशोधक थॉमस अल्वा एडिसनशी काय संबंध? … ते पुढे येईलच. त्यापूर्वी एडिसन नावाच्या एकाच माणसाने चौऱ्याऐंशी वर्षांच्या प्रदीर्घ आयुष्यात वैज्ञानिक संशोधनाचा घेतलेला ध्यास आणि त्यातून लागलेले जगाचा चेहरामोहरा बदलणारे शोध यांची कथा आजच्या भाषेत ऍमॅझिंग किंवा विलक्षण आहे.

या एकाच माणसाने किती शोध लावावेत याची कहाणी चकित करणारी. ‘ध्यास उत्तमाचा घ्यावा’ हे ब्रीद त्याच्या मनात बालपणीच रुजलं. अठराव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकेत युरोपीय वसाहतींचं प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढलं. काही जण स्कॅन्डेनेव्हियातूनही आले. एडिसनचे वडील एका ‘डच’ कुटुंबातले म्हणजे आजच्या नेदरलॅण्ड किंवा पूर्वीच्या हॉलॅण्डमधले होते. त्यांचं मूळ आडनाव एडेसन. त्याचं नंतर एडिसन झालं. घरची परिस्थिती अगदीच बेताची. त्यात वयाच्या बाराव्या वर्षी एडिसनला स्कार्लेट फीवर नावाच्या तापाने ग्रासलं. त्याचा परिणाम असा झाला की, त्याला एका कानाने पूर्ण बहिरेपण आलं. दुसऱ्या कानानेही थोडं कमीच ऐकू येऊ लागलं. आधीच गरिबी, त्यातच हे दुखणं झाल्याने या दिव्यांग मुलाचं कसं होणार याची आई-वडिलांना काळजी वाटणं स्वाभाविक होतं, परंतु स्वतः एडिसन प्रचंड उत्साही होता. चार पैसे मिळविण्यासाठी वर्तमानपत्रं घरोघर टाकणं, रेल्वे स्टेशनवर कॅन्डी विकणं असे उद्योग सुरू केले.

हे करत असतानाच त्याची आई त्याला वाचन-लेखन, गणित असं शिकवत असे. त्या गोष्टींवर एडिसन स्वतंत्रपणे विचार करायचा. त्यातून त्याने केमिस्ट्री (रसायनशास्त्र) आणि नुकत्याच उदयाला आलेल्या टेलिग्राफीचा अभ्यास सुरू केला. यावेळी त्याच्या आयुष्याला टर्न (वळण) देणारी एक घटना घडली. जिमी नावाच्या एका तीन वर्षांच्या मुलाला त्याने प्रसंगावधानाने ट्रेनखाली येण्यापासून वाचवलं. या जिमीचे वडील त्या काळातले रेल्वेचे सार्जन्ट होते. त्यांनी खुश होऊन एडिसनला टेलिग्राफचं ज्ञान दिलं. महत्त्वाकांक्षी एडिसनला असंच काहीतरी हवं होतं. त्यातूनच पुढे टेलिग्राफिक यंत्राची निर्मिती झाली. नित्यनवीन संशोधन आणि त्याचबरोबर त्याचं यशस्वी ‘मार्केटिंग’ या दोन्ही गोष्टी एडिसनला उत्तम जमल्या. अगदी रस्त्यावर पेपर विकण्याचाही ‘एकाधिकार’ (पेटंट) त्याने तरुण वयातच मिळवला होता. पुढे चार सहकाऱ्यांसह एकूण चौदा कंपन्यांची मालकी एडिसनकडे आली.

न्यूयॉर्कमधल्या एका तळघरात एडिसनची प्रयोगशाळा आकाराला आली. या लॅबमध्ये विविध प्रकारची शेकडो रसायनं, तसंच अनेक प्रकारचे ‘क्रू’ तयार होत असत. अगदी कृत्रिम ‘सिल्क’चंही (रेशीम) संशोधन चालायचं. उपयुक्त असं काही घडवायचं तर साकल्याने विचार करण्यावाचून पर्याय नाही हे एडिसनला जाणवलं होतं. तशा आशयाचं सर रेनॉल्ड यांचं वचन त्याने आपल्या टेबलावर ठेवलं होतं.

एडिसनच्या अनेक संशोधनांपैकी मेणाच्या तबकडीवरचं ध्वनिमुद्रण क्रांतिकारक ठरलं आणि त्याचबरोबर इलेक्ट्रिक बल्ब आणि चलतचित्रांचा कॅमेरा या संशोधनांमुळे अवघ्या एका शतकात जगातल्या ‘डॉक्युमेन्टेशन’विषयीच्या संकल्पनाच बदलल्या. पूर्वी शिलालेखात, ताम्रपटावर किंवा भूर्जपत्रावर (एका झाडाची साल) अथवा कागदावर होणाऱ्या नोंदी आता थेट त्या व्यक्तीच्या आवाजात आणि नंतर दृश्य स्वरूपातही करणं शक्य झालं. एडिसनच्या दिव्याच्या ‘दिव्य’ शोधाविषयी आपण पुढच्या लेखात वाचणारच आहोत. या लेखापुरते त्याचे दोन शोध जग किती बदलत गेले याचा विचार करा. ध्वनीचा आघात मेणाच्या तबकडीवर नोंदवून तो बारीक सुई (पिन) आणि ध्वनी कंपनं वाढविणाऱ्या यंत्राद्वारे पुन्हा जसाच्या तसा ‘ऐकवणं’ हे अभूतपूर्व होतं. यापूर्वी मानवी इतिहासात कुणाचा स्वर ‘रेकॉर्ड’ झालेलाच नव्हता. तसंच कोणाची तरी हालचाल ‘सेल्युलॉड’वर (फिल्म) ग्रथित करून ती पडद्यावर दाखवणं ही तर ‘चमत्कार’च वाटण्यासारखी गोष्ट होती, पण हा ‘चमत्कार’ नव्हे तर वैज्ञानिक आविष्कार होता आणि त्याचा जनक होता थॉमस अल्वा एडिसन.

आपल्या ‘फोनोग्राफ’वर त्याने बालपणीची 1830 पासून प्रचलित असलेली लॉवेल मॅसन यांची जी कविता म्हटली ती ‘मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब, इट्स फ्लीस वॉज व्हाइट ऍज स्नो’ (मेरीकडच्या कोकराची लोकर हिमशुभ्र होती आणि मेरी जिथे जाईल तिथे ते जात होतं.). पुढे 84 व्या वर्षी 1931 मध्ये एडिसनने तीच कविता कॅमेऱ्यासमोर म्हटली. पिढय़ान्पिढय़ांच्या पाठांतरातून प्रवाही झालेले हे काव्य एडिसनच्याच स्वरात नोंदलं गेलं आणि अमर झालं. म्हणून त्याला एडिसनचं बालगीत म्हटलं. आपली कविता जगातला पहिला ध्वनिमुद्रीत शब्द ठरेल अशी कल्पनाही कवीने केली नसेल. ते एडिसनने करून दाखवलं. 12 ऑगस्ट 1877 या दिवशी हे घडलं. तेव्हा एडिसन यांचं वय अवघं तीस वर्षांचं होतं. विशेष म्हणजे ऐकण्याची समस्या असणाऱ्या या माणसाने जगाचं बोलणं, ऐकणं मुद्रित करण्याची वैज्ञानिक कला साध्य केली!