पाऊलखुणा – सरसेनापती कुका प्रधान!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 >> संजीव माधव सुळे

कुका प्रधान म्हणजे खऱ्या अर्थाने मांडवगडचा आधार! महालक देव परमार याचे साम्राज्य राखत असताना मोठ्या प्रदेशावर कुका प्रधान यांचा स्वतःचा अंमल होता. संपूर्ण भारतवर्षात कश्मीर येथील कल्हणप्रभूंपासून ते दक्षिणेतील कलचुरी साम्राज्यापर्यंत ठायी ठायी चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या पराक्रमाच्या कथा सापडत असल्या, तरी सरसेनापती कुकाजी प्रधानांची शौर्यगाथा ज्ञातीच्या इतिहासात एक स्वतंत्र स्थान घेऊन उभी आहे.

13व्या शतकाचा अंतिम काळ म्हणजे क्रूरकर्मा अल्लादिन खिलजीच्या अत्याचारी व विनाशकारी पर्वाचा अत्युच्च काळ होता. याच काळात मध्य प्रदेशातील धारजवळील मांडवगड येथे परमार कुलीन राजा महालक देव परमार अर्थात राजा भोज (द्वितीय) राज्य करीत होता. या राज्यात चित्रगुप्त कायस्थ, चांद्रसेनीय कायस्थ आणि जैन समाजातील लोकांचा प्रामुख्याने भरणा होता. जैन धर्माधिकारी ‘पेथडशा’ हे महालक देवच्या दरबारी पंतप्रधान होते, तर राजाच्या सैन्याचे सरसेनापती होते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ‘वीर कुका प्रधान!’ काही ठिकाणी यांचे नाव ‘कोका’ आणि ‘गोगा’ असेही आढळते.

मांडवगड मध्य हिंदुस्थानातील एक महत्त्वपूर्ण, अभेद्य किल्ला होता. चारही बाजूंनी खंदक असलेल्या किल्ल्याच्या उत्तरेला नर्मदामैया रक्षणकर्ती बनून वाहते, तर नैऋत्येला विंध्याद्री पर्वत पाठराखण करतो. हिंदू राजवटीतील अत्यंत महत्त्वाचे असे हे राज्य जिंकल्याशिवाय मोगलांचा हिंदुस्थानवरील विजय पूर्ण होत नव्हता. त्यामुळे तेराव्या शतकाच्या शेवटच्या काही काळातच साधारणतः 1298 च्या सुमारासच अल्लादिन खिलजी मांडवगडावर धडका देत होता, परंतु भक्कम किल्ल्याचे तितकेच भक्कम सरसेनापती कुका प्रधान प्रत्येक वेळी हे हल्ले यशस्वीपणे परतवून लावीत होते.

कुका प्रधान म्हणजे खऱ्या अर्थाने मांडवगडचा आधार! महालक देव परमार याचे साम्राज्य राखत असताना मोठ्या प्रदेशावर कुका प्रधान यांचा स्वतःचा अंमल होता. लोकहितार्थ अनेक कामे करणाऱ्या कुकाजींनी मांडवगडच्या ‘लोहाणी गुंफा’ परिसरात भव्य देवालयांचेही निर्माण केले होते. जवळपास दीड लाख सैन्याचे नेतृत्व करणारे कुकाजींचे पोलादी व्यक्तिमत्त्व हा अल्लादिन खिलजीच्या वाटेतला मुख्य अडथळा होता.शेवटी सन 1305 मध्ये खिलजीने आपला क्रूर, बलाढ्य सेनापती ‘ऐन अल् मुल्क’ याला प्रचंड फौजेनिशी मांडवगडावर धाडले. ऐन अल् मुल्कने पूर्ण ताकदीनिशी आक्रमण केले, परंतु कुकाजींच्या चाळीस हजार घोडदळापुढे आणि एक लाखाच्या पायदळापुढे ऐन अल् मुल्कला वारंवार शिकस्त खावी लागत होती. मात्र हिंदुस्थानी शौर्याच्या इतिहासाला पडलेला फितुरीचा डाग इथेही पाहायला मिळाला. त्यामुळेच किल्ल्यात शिरण्याचा गुप्त मार्ग मोगलांना समजू शकला आणि पाहता पाहता ऐन अल् मुल्कचे सैन्य चारही बाजूंनी किल्ल्यात शिरले. संतप्त झालेला चांद्रसेनीय कायस्थ प्रभू शिरोमणी वीर सेनापती कुकाजी प्रधान स्वतः या रणधुमाळीत शिरून आपल्या अफाट पराक्रमाने मोगल सैन्य कापून काढू लागले. मोकळ्या मैदानात गरगरत फिरणाऱ्या वावटळीने मार्गात येईल ते उडवून लावावं तसंच तांडव आज कुकाजींनी मांडलं होतं. टप्प्यात येणारं शत्रूचं प्रत्येक मुंडकं हवेत उडून पडत होतं.

या रौद्र आगीला शांत केल्याखेरीज मांडवगड हातात येणं अवघड आहे हे ओळखलेल्या मोगलांनी आता एकट्या कुकाजींना सर्व बाजूने घेरलं. हातात शस्त्र घेऊन कुकाजींशी समोरासमोर लढत द्यायची हिंमत एकाही मोगल सैनिकात नव्हती. कुकाजींचा आवेशच इतका जबरदस्त होता की, समोरून वार करण्याचा विचारही शत्रू करू शकत नव्हता. शेवटी मोगलांनी नेहेमीच्याच कपटनीतीचा अवलंब केला. एका कुकाजी प्रधानांसाठी खास धनुर्धारी सैनिकांचे एक पथक पाचारण करण्यात आले. चारही बाजूने घेरत या पथकाने कुकाजींवर बाणांचा एकच वर्षाव केला. कुकाजींच्या शरीरात अशी एकही मोकळी जागा उरली नाही की जिथे बाण रुतलेला नसेल. अशाही रक्तबंबाळ अवस्थेत शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या, पण मोगलांकडून हार न पत्करणाऱ्या कुका प्रधानांनी शेवटी मृत्यूसमोर मात्र हार पत्करली! लढता लढता रणांगणात देह ठेवला, पण जिवंतपणी किल्ला शत्रूच्या हातात ठेवला नाही. हा दिवस होता, मार्गशीर्ष शु. 7, गुरुवार, शके 1227, अर्थात, दि. 5 नोव्हेंबर 1305!

सरसेनापती महापराक्रमी कुकाजी प्रधान धारातीर्थी पडलेले कळताच राजा महालक देव पळून जाऊन लपून बसला. तरीही थोड्याच दिवसांत त्याला शोधून काढून ऐन अल् मुल्कने राजालाही ठार मारले. मांडवगडचा पूर्ण पाडाव झाला. या विजयात आजवर मुख्य अडथळा ठरलेल्या कुकाजींचे शीर कापून दिल्लीला पाठवण्यात आले. आमिर खुस्रो लिहितो की, विजयाच्या या उन्मादात कुकाजीचे मस्तक भाल्यांच्या टोकावर भर चौकात टांगून ठेवण्यात आले होते. तब्बल सात दिवस असा आनंदोत्सव केला गेला, मिठाई वाटली गेली. हेही कमी म्हणून की काय, दिल्लीच्या प्रवेशद्वारातून येणाऱ्या जाणाऱ्या घोडेस्वारांच्या टापांखाली यावे म्हणून भाल्यांवरून उतरवून हे शीर दिल्लीच्या प्रवेशद्वारात मातीत गाडले गेले.

या पराभवानंतर मांडवगडच्या कायस्थ समाजापैकी काही जण नर्मदेच्या घनदाट जंगलातून मार्गक्रमण करीत महाराष्ट्रातील मावळ प्रांतात येऊन स्थिरावले, तर काहींनी मांडवगडहून वल्लभपूर, सौराष्ट्र, खंबायत वगैरे मार्गाने समुद्रमार्ग जवळ केला. वल्लभपूर (वळा) येथे आजही वल्लभकुलीन कायस्थ समाज आढळतो. यांचा व्यापारी संबंध त्या काळी महाराष्ट्रातील श्रीवर्धनशी होता. त्याचाच फायदा घेत काही कुटुंबे समुद्रमार्गे महाराष्ट्रात श्रीस्थानकापासून (ठाणे) श्रीवर्धनपर्यंत स्थायिक झाली. अशा रीतीने मांडवगड पडल्यानंतर चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातील 36 कुळांची, 28 गोत्रांची 42 कुटुंबे (500 हून अधिक माणसे) महाराष्ट्रात उतरली, तर काही उत्तरेत जाऊन स्थिरावली. उत्तरेत हा समाज आजही ‘लाला’ म्हणून ओळखला जातो व चांद्रसेनीय कायस्थ प्रभू आपलेच भाऊबंद आहेत हे ते ओळखून आहेत.

संपूर्ण भारतवर्षात कश्मीर येथील कल्हणप्रभूंपासून ते दक्षिणेतील कलचुरी साम्राज्यापर्यंत ठायी ठायी चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या पराक्रमाच्या कथा सापडत असल्या तरी सरसेनापती कुकाजी प्रधानांची शौर्यगाथा ज्ञातीच्या इतिहासात एक स्वतंत्र स्थान घेऊन उभी आहे. आयुष्यात एकदा तरी मध्य प्रदेशमधील धारजवळील मांडवगड येथे जाऊन कुकाजींच्या वीररक्ताने पावन झालेल्या मातीत नतमस्तक होणे हे प्रत्येक आपले कर्तव्य आहे!