सचिन पायलट गद्दार, कधीच मुख्यमंत्री बनणार नाही; अशोक गेहलोत यांची टीका

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. प्रचारासाठी गुजरातला गेलेल्या अशोक गेहलोत यांनी थेट सचिन पायलट यांच्यावरच निशाणा साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पायलट यांना गद्दार म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा राजस्थान काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘एक गद्दार कधीच मुख्यमंत्री बनू शकत नाही. हायकमांड सचिन पायलट यांना कधीच मुख्यमंत्री बनवू शकत नाही. त्यांच्याकडे दहा आमदार देखील नाही. त्यांनी बंडखोरीही केली. पक्षाला धोका दिला. ती व्यक्ती गद्दार आहे. असं हिंदुस्थानात पहिल्यांदाच घडलं की एका पक्षाचा अध्यक्ष त्यांच्याच पक्षाचं सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होता”, असे अशोक गेहलोत म्हणाले.

यावेळी त्यांनी सचिन पायलट यांना भाजपने पैसा पुरवल्याचा आरोप देखील केला. ”त्यांच्या त्या बंडामागे भाजपचा मोठा हात होता. अमित शाह यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांचा त्यात समावेश होता’, असे गेहलोत म्हणाले.