श्रीलंका नाही तर ‘या’ देशात रंगणार आशिया चषक, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदाचा आशिया चषक श्रीलंकेमध्ये होणार होता. परंतु श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय परिस्थिती पाहता येथे ही स्पर्धा खेळवणे अशक्य आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आगामी आशिया चषक स्पर्धा श्रीलंकेमध्ये नाही तर संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये खेळवला जाईल, अशी घोषणा सौरव गांगुली यांनी केली.

गुरुवारी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. श्रीलंकेतील परिस्थिती पाहता आशिया चषक इतरत्र हलवण्याबाबच या बैठकीमध्ये चर्चा झाली. बैठक संपल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आशिया चषक संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये खेळवला जाईल असे म्हटले. या ठिकाणी पाऊसही पडणार नाही, असे कारणही त्यांनी सांगितले.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने बुधवारी आशियाई क्रिकेट परिषदेला देशात उद्भवलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटामुळे आशिया चषकाचे आयोजन करण्याची परिस्थिती नसल्याचे कळवले होते. देशातील या संकटामुळे यंदा लंका प्रीमियर लीगचे आयोजनही करण्यात आलेले नाही. परंतु या काळातही श्रीलंकेमध्ये ऑस्ट्रेलियाने वन डे आणि कसोटी मालिका खेळली. तसेच पाकिस्तानविरुद्धही कसोटी मालिका खेळली. मात्र पाकिस्तानविरुद्धचा कोलंबो येथील सामना गॅलेला हलवण्यात आला होता.

दरम्यान, आशिया चषक स्पर्धा सुरू होण्यास अवघ्या काही आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा होणार असून गतविजेत्या हिंदुस्थानच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. कारण ही स्पर्धा संपल्यानंतर हिंदुस्थानला ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्डकपही खेळायचा आहे. वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने आशिया चषक महत्त्वाचा असणार आहे.

बस झालं, आता वन डे क्रिकेट गुंडाळा; 502 बळी घेणाऱ्या दिग्गज खेळाडूची अजब मागणी

आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत हिंदुस्थाननेच बाजी मारलेली आहे. हिंदुस्थानने आतापर्यंत 6 वेळा या स्पर्धेची जेतेपदे पटकावली आहेत. श्रीलंकेने आतापर्यंत पाच वेळा जेतेपदे पटकावली आहेत. पाकिस्तानला आतापर्यंत दोन वेळाच ही स्पर्धा जिंकता आलेली आहे. पण बांगलादेशला मात्र आतापर्यंत एकदाही ही स्पर्धा जिंकता आलेली नाही.

आतापर्यंतचे आशिया चषकाचे विजेते

– 1984 (शारजा) विजेता – हिंदुस्थान
– 1986 (श्रीलंका) विजेता- श्रीलंका
> 1988 (बांगलादेश) विजेता – हिंदुस्थान
– 1990 (हिंदुस्थान) विजेता – हिंदुस्थान
– 1995 (यूएई) विजेता – हिंदुस्थान
– 1997 (श्रीलंका) विजेता – श्रीलंका
– 2000 (बांगलादेश) विजेता – पाकिस्तान
– 2004 (श्रीलंका) विजेता – श्रीलंका
– 2008 (पाकिस्तान) विजेता- श्रीलंका
– 2010 (श्रीलंका) विजेता – हिंदुस्थान
– 2012 (बांगलादेश) विजेता – पाकिस्तान
– 2014 (बांगलादेश) विजेता – श्रीलंका
– 2016 (बांगलादेश) विजेता – हिंदुस्थान