हिंदुस्थानच्या महिला टेबल टेनिस संघाने मंगळवारी इतिहास घडविला. त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या दक्षिण कोरियावर 3-2 फरकाने रोमहर्षक विजय मिळवून आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत धडक देत हिंदुस्थानचे पदक पक्के केले. स्पर्धेच्या इतिहासातील हिंदुस्थानचे हे पहिले पदक ठरले आहे, हे विशेष!
अहिका, मनिकाची विजयी सुरुवात
अहिका मुखर्जी ही खऱ्या अर्थाने या ऐतिहासिक विजयाची शिल्पकार ठरली. तिने दक्षिण कोरियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत विजयी श्रीगणेशा केल्यानंतर अखेरच्या निर्णायक लढतीतही जीवाची बाजी लावत हिंदुस्थानच्या विजयात मोलाची भूमिका बजाविली. पहिल्या सामन्यात अहिका मुखर्जीने कोरियाच्या युबिन शिन हिचा 11-9, 7-11, 12-10, 7- 11, 11-7 (3-2) असा पराभव करीत हिंदुस्थानला झकास सुरुवात करून दिली. त्यानंतर स्टार खेळाडू मनिका बत्राने दुसऱ्या लढतीत जिओन जिही हिचा 12-11, 13-11, 11-5, 5-11, 12-10 (4-1) असा पराभव करीत हिंदुस्थानला 2-0 असे आघाडीवर नेले.
कोरियाचे दमदार पुनरागमन; पण…
तिसऱ्या एकेरी लढतीत दक्षिण कोरियाच्या इयून्ही ली हिने हिंदुस्थानच्या श्रीका अकुला हिचा 11-6, 12-10, 11-8 (3-0) असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवून आपल्या संघाचे खाते उघडले. त्यानंतर मनिका बत्राचाही परतीच्या एकेरी लढतीत पराभव झाला. तिला युबिन शिन हिने 13-11, 11-4, 6-11, 7-11, 12-10 (3-2) असे हरवून दक्षिण कोरियाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. त्यामुळे अहिका मुखर्जीच्या निर्णायक परतीच्या लढतीकडे देशवासीयांच्या नजरा खिळल्या होत्या. तिने या लढतीत कोरियाच्या झिई जिऑन हिचा 7-11, 11-6, 12-10, 12-10 (3-1) असा धुव्वा उडवून हिंदुस्थानच्या ऐतिहासिक विजयात निर्णायक भूमिका बजाविली.
आता जपान किंवा सिंगापूरचे आव्हान
हिंदुस्थानी महिला संघाची उपांत्य फेरीत जपान आणि सिंगापूर यांच्यातील विजेत्या संघाशी बुधवारी (9 रोजी) गाठ पडणार आहे. गतवर्षीच्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत हिंदुस्थानी संघ सहाव्या स्थानावर फेकला गेला होता. पाचव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत त्यांना थायलंडने 3-0 फरकाने हरविले होते. मात्र, या वर्षी हिंदुस्थानी महिलांनी पदक पक्के करून आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.