देवाच्या सुपर कॉम्प्यूटरमधून कोरोना निर्माण झाला….भाजपच्या मंत्र्यांचे विधान…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असतानाच आसाममधील भाजपमंत्र्यांनी कोरोनाबाबत हास्यापद विधान करून नवीन वाद ओढवून घेतला आहे. देवाच्या सुपर कॉम्प्यूटरमधून कोरोना व्हायरस निर्माण झाला आहे. कोरोनामुळे कोणाकोणाचा मृत्यू होणार याची यादी देवानेच बनवल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच हे देवानेच निर्माण केलेले असल्याने ही साथ रोखण्यास जागतिक आरोग्य संघटनेला (डब्लूएचओ) अपयश आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भाजपचे आसाममधील परिवहन मंत्री चंद्रमोहन पटवोरी यांनी हे विधान केल्याने नवीन वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत.

चंद्रमोहन पटवोरी यांच्याकडे परिवहन, उद्योग आणि वाणिज्य ही महत्त्वाची खाती आहेत. गुवाहाटीमध्ये एका योजनेतील लाभार्थ्यांना आर्थिक मदत करताना त्यांनी हे विधान केले आहे. या रोगाच्या साथीत कोण संक्रमित होणार, यात कोणाचा मृत्यू होणार हे सर्व प्रकृतीने निश्चित केले आहे. देवाच्या सुपर कॉम्प्यूटरमधूनच हे सर्व होत आहे, असा दावा चंद्रमोहन यांनी केला आहे.

हे सर्व मानवनिर्मित नाही. देवाच्या सुपर कॉम्प्यूटरनेच हा व्हायरस पृथ्वीवर पाठवण्याचा निर्णय घेतला. या साथीचा मृत्यूदरही प्रकृतीनेच निश्चित केला आहे. आपण प्रकृतीच्या विरोधात गेल्यानेच आता प्रकृतीनेच मानवतेविरोधात युद्ध सुरू केले आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनाही या साथीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याचे चंद्रमोहन यांनी सांगितले.

देशाने एक कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला आहे. देशाच्या या कामगिरीचे जगभरात कौतुक होत असताना चंद्रमोहन यांनी हे विधान केले आहे. देशाने एक कोटी लसीकरणाचा टप्पा पार केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंत्रणांचे कौतुक केले आहे. देशाचे कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाचे यश मिळवले असतानाच चंद्रमोहन यांनी हे विधान करत नवीन वाद ओढवून घेतला आहे.