गोव्यात 79 टक्के बंपर मतदान; भाजपची धाकधूक वाढली!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा विधानसभा निवडणुकीच्या सर्व 40 जागांसाठी आज एकाच टप्प्यात मतदान झाले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 78.94 टक्के इतके बंपर मतदान झाल्याने पुन्हा सत्तेत येण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपची धाकधूक वाढली आहे. भाजप विरोधात आघाडी करून लढण्याऐवजी स्वतंत्र लढणाऱ्या कॉँग्रेसच्या गोटातही काहीसे चिंतेचे वातावरण गोव्यातील विक्रमी मतदानामुळे निर्माण झाले आहे.

गोवा हे इतर राज्यांच्या तुलनेत छोटे राज्य असले तरी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी युती, आम आदमी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हे पक्ष निवडणुकीच्या आखाडय़ात उतरल्यामुळे गोव्यात चुरस वाढली आहे.

मतदानाआधी गोव्यात सत्ताधारी भाजप आणि कॉँग्रेसमध्येच प्रामुख्याने लढत होईल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, गोव्यातील बंपर मतदानामुळे येथील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

युती आणि आघाडीसाठी तयारी सुरू

गोव्यातील 40 जागांसाठी एकूण 301 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज गोव्यातील काही नेत्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी युती आणि आघाडीसाठी आतापासूनच तयारी सुरू केल्याचं बोललं जातंय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूकपूर्व युतीची घोषणा केली आहे.

या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर (मगोप), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अमित पालेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात 61 टक्के मतदान

उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातही भरघोस मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात, पश्चिम यूपीच्या 9 जिह्यांतील  विधानसभेच्या 55 जागांसाठी सरासरी 61.33 टक्के मतदान झाले. समाजवादी पार्टीचा गढ समजल्या जाणाऱ्या मुस्लिम बहुसंख्य जागांवर 72 पेक्षा जास्त म्हणजे सुमारे 11 टक्के जास्त मतदान झाले. हिजाबच्या वादात दुसऱ्या टप्प्यासाठी झालेले मतदान हे भाजपसाठी मोठे आव्हान मानले जात आहे.

सायकलचे बटण दाबल्यावर कमळाला मत

उत्तर प्रदेशात मतदान यंत्रात गडबड केल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे. मतदानावेळी मतदारानं सायकल चिन्हाचं बटण दाबूनही कमळाला मत दिल्याची चिठ्ठी मिळत असल्याची तक्रार सपाने निवडणूक आयोगाकडे केली. मुरादाबादमधील एका मतदाराचा व्हिडिओ देखील याचा पुरावा म्हणून ट्विट केला आहे.

उत्तराखंडमध्ये 61 टक्के मतदान

उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात पार पडलेल्या निवडणुकीत विधानसभेच्या 70 जागांसाठी सरासरी 61 टक्के मतदान झाले. उत्तराखंडमध्ये गेल्या निवडणुकीपेक्षा कमी मतदान झाले आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 62.5 टक्के मतदान झाले होते, तर 2017 मध्ये एकूण मतदानाच्या 65.56 टक्के मतदान झाले होते.