
सामना प्रतिनिधी, मुंबई
वर्ष 2012 मध्ये रात्रीची गस्त घालत असताना कार चोरणाऱ्या टोळीला पकडण्याच्या प्रयत्नात असताना आरोपींनी कारची धडक दिल्याने त्यात मृत्यू झालेल्या सहाय्यक फौजदार दत्तू सरनोबत यांना पोलीस महासंचालकांनी यथोचित सन्मान केला आहे.
सरनोबत यांच्या जिगरबाज कामगिरीची दखल घेत महासंचालकांनी त्यांना शहीदाच्या यादीत समाविष्ट केले आहे. 30 ऑगस्ट 2012 च्या रात्री दत्तू सरसोबत हे त्यांच्या सहकाऱयांसह वांद्रे रेल्वे स्थानक पूर्वेकडे गस्त घालत होते. त्यावेळी कार चोरणारी टोळी त्यांच्या नजरेस पडली. सरनोबत यांनी त्या चोरांच्या दिशेने धाव घेतली आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा चोरांनी कार सरनोबत यांच्या अंगावर घातली. यात गंभीर जखमी झालेल्या सरनोबत यांचा मुंबई रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता.
सरनोबत यांच्या कामाची योग्य दखल घेऊन त्यांना शहीदाचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी खेरवाडीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केली होती. त्याची पोलीस महासंचालकांनी दखल घेतली असून सरनोबत यांना शहीदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे.

























































