केजरीवालांना इन्सुलिन न देणं ही सरकारची क्रूरता, आप नेत्या आतिशी यांचा आरोप

आप नेत्या आतिशी यांनी अरविंद केजरीवाल यांना मधुमेह असूनही इन्सुलिन दिलं जात नसल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला आहे. दरम्यान, आम आदमीचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनीही कारागृह प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. हा केजरीवाल यांना हळुहळू संपवण्याचा एक क्रूर कट असल्याचंही भारद्वाज यांनी म्हटलं आहे.

कथित अबकारी कर घोटाळ्याचा आरोप झाल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना न्यायालयाने घरचं जेवण देण्यास परवानगी दिली आहे. केजरीवाल यांना टाईप 2 प्रकारचा मधुमेह आहे. या प्रकारात रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी ही अस्थिर असते. त्यामुळे केजरीवालांचे वकील विवेक जैन यांनी न्यायालयात याचिका दाखल करून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून डॉक्टरांशी संवाद साधण्याची परवानगी मागितली होती. त्यावर ईडीने केजरीवाल हे जाणूनबुजून अधिक गोड खात असल्याचा युक्तिवाद केला होता. मात्र, राऊज एव्हेन्यू न्यायालयाने आपला निर्णय सुरक्षित राखत संबंधित प्रश्नावर 22 एप्रिल रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

त्या दरम्यान, आप नेत्या आतिशी यांनी शनिवारी केजरीवाल यांच्या प्रकृतीचे अहवाल शेअर करून सरकारवर क्रूर असल्याचा आरोप केला आहे. 12 ते 17 एप्रिल दरम्यानचे अरविंद केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेच्या तपासणीचे अहवाल त्यांनी शेअर केले आहेत. केजरीवाल यांच्या रक्तातील साखरेची पातळी अधिक दिसून आली आहे. तरीही कारागृह प्रशासनाने अद्याप इन्सुलिन देऊ दिलेलं नाही. इन्सुलिन मिळालं नाही तर रुग्णाचे अवयव हळूहळू निकामी होत जातात. हा शुद्ध क्रूरपणा आहे, असा आरोप आतिशी यांनी केला आहे.