हिंगोलीच्या पालकमंत्रीपदी अतुल सावे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्यातील आठ जिल्ह्यासाठी नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीचे आदेश एका शासन निर्णयाद्वारे काढण्यात आले आहेत. यामध्ये उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांची हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आता गडचिरोलीचे नवे पालकमंत्री राहणार आहेत.

दिलीप कांबळे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यापासून अर्थात 24 दिवस पालक मंत्री पद रिक्त होते. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 11 जून रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यामध्ये भाजपच्या सहा मंत्र्यांना वगळण्यात आले होते. सुमार कामगिरी व भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनाही मंत्रिमंडळातून मुख्यमंत्र्यांनी डच्चू देत राजीनामा घेतला. दरम्यान, विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यावर राज्य शासनाने नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

संभाजीनगर पूर्वचे आमदार आणि नवनियुक्त उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांच्याकडे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धुरा सोपवण्यात आली आहे. तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे आता वर्ध्या ऐवजी चंद्रपूर सोबतच गडचिरोलीचे पालकमंत्री राहणार आहेत. पालघरचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, भंडारा व गोंदिया या दोन जिल्ह्यासाठी राज्यमंत्री परिणय फुके, आणि कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे अमरावती तर मंत्री संजय कुटे हे बुलढाण्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. वर्धा जिल्हा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. निवडणुकीची आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या 15 तारखेनंतर कधीही लागण्याची शक्यता असल्यामुळे नव्या पालकमंत्र्यांना अडीच महिन्याचा कालावधी मिळणार आहे.