संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघाचे कोरोनामुळे दूध संकलन बंद

558

शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या दुधाचे संकलन संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या वतीने केले जाते. मात्र कोरोनामुळे दूध व्यवसायाला जबर फटका बसला असून त्याचा दूध उत्पादन व विक्रीवर परिणाम झाला आहे. थंडावलेली विक्री आणि वाढत चाललेले संकलन यामुळे जिल्हा दूध उत्पादक संघाचा तोटा वाढत चालला असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दूध संघाने दूध संकलन बंद केले आहे.

जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडील दुधाचे जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ जिल्हाभरातील 465 दूध सहकारी संस्थामार्फत दूध संकलन करतो. कोरोनाची साथ येण्यापुर्वी जिल्ह्यात 80 ते 85 हजार लिटर दूधाचे संकलन होत असे. मात्र  कोरोनाचा प्रादूर्भाव झाल्यापासून अन्य व्यवसायाबरोबरच दूध व्यवसायावरही मोठा परिणाम झाला. खाजगी क्षेत्रातील दुधाचे संकलन यापूर्वीच बंद झालेले आहे. परिणामी जिल्हा दूध संघाकडे दुधाची आवक वाढली होती. प्रतिदिन संकलित होणार्‍या 85 हजार लिटर दूधाच्या संकलनात वाढ होऊन दूध संकलन 90 ते 92 हजार लिटर प्रतिदिन होऊ लागले होते.

दुधाचे संकलन वाढत असले तरी कोरोनामुळे दूध तसेच दूग्धजन्य पदार्थ आदिंची विक्री थंडावल्याने यापुर्वीच आईस्क्रीम, श्रीखंड वगैरेचे उत्पादन बंद झालेले आहे. त्यामुळे दूध संघाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच कोरोनाचा प्रभाव मात्र कमी होण्याऐवजी वाढतच चालला असल्याने, दुधाच्या विक्री अधिकच थंडावत आहे त्यामुळे दूध संघाचे नुकसानही वाढतच चालले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी दूध संघाने दुध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन त्याची तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे. दोन दिवसापासून दुधाचे संकलन करण्यात आलेले नाही उद्याही दूध संकलन होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या