हिंदुस्थानी क्रिकेटपटू बेड, टॉयलेट साफ करताहेत; हॉटेल रूममधून बाहेर येण्यास परवानगी नाही

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधली आणि सिडनी कसोटी ड्रॉ राखताना यजमान ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर दिले. एकीकडे क्रिकेटच्या रणांगणात जबरदस्त कामगिरी केल्यामुळे हिंदुस्थानी क्रिकेटपटूंवर चोहोबाजूंनी काैतुकांचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे मात्र मैदानाबाहेर या क्रिकेटपटूंवर अन्याय होत असताना प्रकर्षाने दिसत आहे. ब्रिस्बेनमध्ये कोरोनाचा प्रभाव नसतानाही हिंदुस्थानी क्रिकेटपटूंवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलॅण्ड सरकारकडून कडक निर्बंध लादले जात आहेत. हॉटेलमधील रूममधून बाहेर येण्यास त्यांना परवानगी देण्यात आलेली नाहीए. तसेच रूममधील बेड व टॉयलेटही त्यांना साफ करायला सांगितले गेले आहे. ही बाब खेदजनक आहे.

हॉटेल रिकामी, पण सुविधा दिलेल्या नाहीत

हिंदुस्थानचा संघ 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे सुरू होणाऱया चौथ्या कसोटीसाठी मंगळवारी तेथे पोहोचला. गॅबा स्टेडियमपासून चार किलोमीटर दूर असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंची राहण्याची सोय करण्यात आली. हे संपूर्ण हॉटेल रिकामी आहे, पण तरीही हिंदुस्थानी खेळाडूंना येथील सुविधांचा उपयोग घ्यायला देण्यात येत नाही. स्वीमिंग पूल, जिमपासून त्यांना दूर ठेवले जात आहे. हॉटेलमधील कॅफे व रेस्टॉरंटही बंद ठेवलेले आहेत. तसेच शेजारच्या हिंदुस्थानी रेस्टॉरंटमधून हिंदुस्थानी खेळाडूंना जेवण मागवले जात आहे. हे जेवण फ्लोअरवर ठेवण्यात येते. खेळाडूंना फ्लोअर ओलांडायलाही परवानगी देण्यात आलेली नाही अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांकडून यावेळी देण्यात आली.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वचन तोडले

हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना सर्व सुविधा दिल्या जातील असे वचन क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून बीसीसीआयला देण्यात आले होते. क्वारंटाइन कालावधीनंतर हिंदुस्थानी खेळाडूंचे आतापर्यंत 15 ते 20 वेळा स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या आहेत, पण तरीही हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. ऑस्ट्रेलियन संघ हिंदुस्थानात आल्यानंतर आमच्याकडून त्यांच्या खेळाडूंना अशी वागणूक दिली तर चालेल का, असा सवालही बीसीसीआय सूत्रांकडून यावेळी करण्यात आला आहे.

बीसीसीआयकडून मध्यस्थीनंतर सुविधांचे आश्वासन

टीम इंडियाच्या संघ व्यवस्थापनाने बीसीसीआयकडे या प्रकरणाबाबत तक्रार केल्यानंतर बीसीसीआयने याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाशी संवाद साधला. त्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सर्व सुविधा देण्याचे पुन्हा आश्वासन दिले. हॉटेलमधील सर्व लिफ्ट, जिमचा वापर खेळाडू करू शकतील. रूम सर्व्हिस व हाऊसकिंगची सुविधाही त्यांना देण्यात येईल. संघ बैठका घेण्यातही कुठलीही अडचण येणार नाही असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून यावेळी सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या