9 जुलैपासून राज्यभरातील ऑटो रिक्षा संपावर

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील ऑटो रिक्षाचालक-मालक संघटनांच्या कृती समितीने रिक्षांच्या भाडेवाढीसह अन्य प्रलंबित मागण्यांवर 30 जूनपर्यंत विचार न झाल्यास येत्या 9 जुलैपासून राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे. ऑटो रिक्षाचालक-मालक संघटनेच्या कृती समितीने गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉल येथे रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

हकीम कमिटीच्या शिफारशींनुसार ऑटो रिक्षाच्या भाडय़ात वाढ करावी, ओला-उबर या खासगी सेवांवर बंदी आणावी, आदी मागण्यांसाठी राज्यातील ऑटो रिक्षाचालक-मालक संघटनेच्या कृती समितीने गोरेगाव येथे रविवारी बैठक घेत प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. त्यानंतर समितीने मागण्यांचे निवेदन परिवहनमंत्री आणि मुख्यमंत्री यांना देण्याचे ठरविले असून येत्या 30 जूनपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास येत्या 9 जुलैपासून ऑटो रिक्षाचालक-मालक संपावर जातील.

कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी
ऑटो रिक्षाचालक-मालकांसाठी राज्य सरकारने कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी, हे महामंडळ परिवहन खात्यांतर्गत असावे, विमा कंपन्यांऐवजी या महामंडळाकडे विम्याची रक्कम भरली जावी, या कल्याण निधीद्वारे रिक्षाचालकांना पेन्शन, ग्रॅच्युईटी, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय मदत देण्यात यावी, अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी विशेष भरारी पथकांची स्थापना करावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष विलास भालेकर यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या