अनिता खरात यांना पुरस्कार

सेकंडरी स्कूल्स् एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, मुंबई या संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक-शिक्षकेतर पुरस्कार’ अनिता खरात यांना जाहीर झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱयांची एकमेव अग्रगण्य पगारदार सहकारी पतसंस्था शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱया शिक्षक-शिक्षकेतरांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करते. अनिता खरात या युसूफ मेहरअली विद्यालय, ताडदेव या शाळेत गेली 25 वर्षे कार्यरत असून शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी नोकरीव्यतिरिक्त विशेष योगदान देत आल्या आहेत. त्या ‘मातृ मंदिर’, देवरुख व ‘वात्सल्य मंदिर’, ओणी या अनाथ मुली व मुलांसाठीच्या संस्था, आदिवासी उपयोजनेअंतर्गत येणारी डॉ. दत्ता सामंत माध्यमिक विद्यालय ही कर्जत येथील शाळा, ‘नारायण चंद्र ट्रस्ट’ विरार येथील बालकाश्रम व वृद्धाश्रम, प्रामुख्याने एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारी सफल विकास वेल्फेअर सोसायटी आणि राष्ट्र सेवा दलामध्ये सक्रिय आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई, गं. द. आंबेकर मार्ग, परेल येथे होणार आहे.