
सामना ऑनलाईन। अयोध्या
प्रभू रामचंद्रांची अयोध्या पुन्हा एकदा भगवी झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या नवनिर्वाचित 18 खासदारांना घेऊन येत्या रविवारी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजली आहे. उद्धव ठाकरे हे दुसऱयांदा सहकुटुंब अयोध्येला येत आहेत हे समजताच अयोध्येतील घराघरामध्ये आनंदाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
उद्धव ठाकरे यांनी गेल्या नोव्हेंबर महिन्यात अयोध्येत रामजन्मभूमीवर जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले होते. लोकसभा निवडणुकीनंतर आपण पुन्हा येऊ असे वचन त्यांनी अयोध्यावासीयांना दिले होते. त्या वचनाच्या पूर्ततेसाठीच उद्धव ठाकरे रविवारी अयोध्येत येत आहेत. उद्धव ठाकरे हे रविवारी सकाळी विमानाने फैजाबादला पोहोचतील. तेथून ते रामलल्लाच्या दर्शनासाठी रामजन्मभूमीकडे रवाना होतील. दरम्यान, काही संत-महंतांचीही ते भेट घेणार आहेत. रामलल्लाच्या दर्शनानंतर दुपारी उद्धव ठाकरे मुंबईला रवाना होणार आहेत.
कडक सुरक्षा व्यवस्था
उत्तर प्रदेश पोलिसांनी उद्धव ठाकरे यांना राज्याचे अतिथी म्हणून घोषित केल्याने त्यांना उत्तर प्रदेशात पोहोचताच झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. फैजाबाद ते रामजन्मभूमीपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या मार्गावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. शनिवारी या सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेतला जाणार आहे.
दौऱयाचे चोख नियोजन
शिवसेना नेते–खासदार संजय राऊत यांनी अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुज कुमार आणि एसएसपी आशीष तिवारी यांच्यासह प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करून उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाचे नियोजन केले आहे. शिवसेनेचे खासदार शनिवारीच अयोध्येत पोहोचणार आहेत.




























































