
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम यांना काल रात्रीपासून रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात ठेवले आहे. या तुरुंगात या व्हीआयपींना ‘बी’ श्रेणीची सुविधा पुरवली आहे. दरम्यान, या दोघांची रवानगी लवकरच इस्लामाबाद येथील सिहाला पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या रेस्टहाऊसमध्ये होणार असून हे रेस्टहाऊस उपतुरुंग म्हणून जाहीर केले जाणार आहे. तोपर्यंत त्यांना आदियालाच्या कारागृहात ठेवले जाईल, असे इस्लामाबाद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शरीफ आणि मरियम हे काल लंडन येथून अबूधाबीमार्गे लाहोर येथे विमानाने आल्यानंतर त्यांना लंडनमधील एव्हेनफिल्ड मालमत्तेप्रकरणी अटक करून काल रात्रीच त्यांची रवानगी कडक सुरक्षा व्यवस्थेत अदियाला जेलमध्ये केली.
ए, बी श्रेणीत सुविधा काय?
सामाजिक, शैक्षणिक दर्जा असलेले आणि उच्च राहणीमानाची सवय असलेल्या कैद्यांना तुरुंगात ‘ए’ आणि ‘बी’ श्रेणीच्या सुविधा देण्यात येतात. त्यांना प्रत्येकी एक कॉट, खुर्ची, कपबशी, लाइट नसेल तर कंदील, छोटेसे कपाट, टॉवेल, साबण पुरवला जातो. हे कैदी मुख्यतः सुशिक्षित असतात. ते ‘सी’ श्रेणीतील कैद्यांना शिक्षण, प्रशिक्षण देण्याची कामे करतात. ते अंगमेहनतीची कामे करीत नाहीत, मात्र अन्य उपयुक्त कामे ते करतात. हे कैदी जेलच्या परवानगीने टीव्ही, फ्रीज, एअरकंडिशनर, वर्तमानपत्रे घेत असतील तर त्याचा सर्व खर्च त्यांना करावा लागतो.
दोघांना शिक्षा काय?
पाकिस्तानमधील अकौटटॅबिलिटी कोर्टाने नवाझ शरीफ यांना १० वर्षे, तर मुलगी मरियमला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलेली आहे. पनामा पेपर्स केसप्रकरणी शरीफ यांना सुप्रीम कोर्टाने गतवर्षीच अपात्र म्हणून घोषित केलेले आहे. अल अझिझिया स्ट्रील मिल्स, फ्लॅगशिप इन्व्हेस्ट प्रकरणातील भ्रष्टाचारप्रकरणी शरीफ आणि इतरांविरुद्ध अदियाला तुरुंगातच खटला चालविला जाणार आहे. याबाबतची अधिसूचना कायदा-न्याय मंत्रालयाने जारी केली आहे असेही स्पष्ट केले आहे.
प्रकृती ठीक
डॉक्टरांच्या एका पथकाने शरीफ, मरियम यांची वैद्यकीय तपासणी केली. या तपासणीमध्ये त्यांची तब्बेत ठीक असल्याचे आढळून आले आहे. या तपासणीच्या वेळी दंडाधिकारी आणि ज्येष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.




























































