अमरसिंहांचा पत्ता कट, बाबांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय

उदय जोशी, बीड

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेतील आमदार अमरसिंह पंडीत यांना पुन्हा उमेदवारी देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या जागी पाथरीच्या बाबा जानी दुर्राणी यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी द्यायचं निश्चित करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातून विधीमंडळात जाणाऱ्या सदस्यांची संख्या कमी होणार आहे.

भाजपचे दिग्गज नेते गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे पक्ष विधीमंडळात जास्तीत जास्त उमेदवार बीड जिल्ह्यातून निवडत होते. बीड जिल्ह्यातून परिषदेवर निवडून जाणाऱ्या आमदारांची संख्या पाच पर्यंत देखील पोहोचलेली राज्याने बघितली आहे. पवार-मुंडे संघर्षामुळे बीडमधील नेत्यांना आमदारकीसाठी फार कष्ट करावे लागत नव्हते. पंचवीस वर्षांपासून विनायक मेटे विधानपरिषदेवर आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित आमदार या विधानपरिषदेवर पाठवलं आहे. भाजपाकडून  नुकतेच सुरेश धस विजयी झाले आहेत, मागील काळात उषाताई दराडे , काँग्रेस कडून सुरेश नवले यांनीही आमदारकी भूषवली होती.

मात्र हे चित्र आता बदलताना दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसने अमरसिंह पंडीत यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी न देण्याचं ठरवलं आहे. त्यांच्याऐवजी बाबा जानी दुर्राणींची निवड करण्यात आली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातून विधीमंडळात जाणाऱ्या आमदाराची संख्या एकने कमी होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या