कान पिळणाऱ्या माकडामुळे पोलीस त्रस्त; वनविभागाने शिताफीने केले जेरबंद

पोलिसांचे नाव ऐकल्यावर भल्याभल्यांची टरकते. पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर आरोपी गन्ह्याची कबुली देतात. सूतावरुन स्वर्ग गाठून आरोपींना अटक करण्याची तत्परता पोलिसांमध्ये असते. मात्र, कोणी पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांचे कान पिळून पोबारा करत असेल तर … विश्वास बसत नाही ना…मात्र, मध्य प्रदेशच्या बैतुलमध्ये अशी घटना घडली आहे. बैतुलमध्ये एका माकडाने पोलिसांना त्रस्त केले होते. वनविभाने मोठ्या शितफीने माकडाला जेरबंद केले आहे. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बैतुलच्या पोलीस ठाण्यात 15 दिवसांपासून एक माकड येत होता. त्याला हुसकावण्याचा प्रयत्न केल्यावर तो थेट पोलिसांवर झेप घेत त्यांचे कान पिळायचा आणि पोबरा करायचा. थोड्या वेळाने येत पुन्हा त्याचे कारनामे सुरू करायचा. पोलीस ठाण्यातील बाकांवर येऊन तो बिनदिक्कत बसायचा. आसपास येणारे पोलीस किंवा जाणाऱ्या येणाऱ्यांना टपली मारत आणि त्यांचे कान पिळण्याचे त्याचे उद्योग सुरू होते. त्यानंतर तर तो पोलीस अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून फायली चाळू लागला. त्याला हुसकावण्याचे अनेक प्रयत्न पोलिसांनी केले. मात्र, या प्रयत्नांचा उलटा परिणाम झाला. या घडामोडींमुळे माकडाची भीड चेपली आणि तो पोलीस ठाण्यात रुबाबात वावरायला लागला.

अनेकदा पोलीस गस्तीला निघत असताना हा माकड बाइकवर त्यांच्या मागे बसायचा आणि कान पिळून बाईक सुरू करण्याचा इशारा करायचा. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाचे कान पिळण्याचा प्रकार त्याने सुरू केला. पोलीस ठाण्याप्रमाणे परिसरातही असाच धुमाकूळ घालण्यास त्याने सुरुवात केली. या माकडाची तक्रार करण्यास पोलीस ठाण्यात गेल्यावर माकड कान पिळून टपली मारायचे. माकडाच्या या धुमाकुळाने नागरिक आणि पोलीस त्रस्त होते. माकडाचा त्रास वाढल्यावर अनेकदा पोलिसांना स्वतःला एका खोलीत बंद करून घ्यावे लागले होते.

या माकडाला पकडण्यासाठी पोलिसांनी वन विभागाची मदत मागितली. एका माकडाला पकडायचे आहे, त्यात काय अवघड असे वन विभागाला वाटले. वन विभागाचे अधिकारी परिसरात पोहचले. माकड दिसताच त्याला पकडण्यासाठी अधिकारी धावले. माकडाने कान पिळून आणि टपली मारत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर हे वेगळे प्रकरण असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाणवले. त्यांनी माकडाला जेरबंद करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवल्या. अनेकदा माकडाने त्यावर मात केली. अखेर वनविभागाने शिताफीन माकडला जेरबंद केले आणि मोवाडच्या जंगलात सोडून आले. माकडाने कोणाला जखमी केले नसले तरी त्याच्यामुळे पोलिसांना कामात अडचणी येत होत्या. आता माकडाला जंगलात सोडण्यात आल्याने पोलिसांनी आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या