
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाली आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी नेमण्यात चांदीवाल आयोगाने सिंह यांच्याविरोधात 50 हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आयोगाच्या सुनावणीसाठी ते उपस्थित राहत नसल्याने ही शिक्षा सुनावण्यात आली असल्याची माहिती आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी दिली.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये आयोगाची स्थापना केली होती. त्यानुसार या आयोगाने आतापर्यंत अनेक वेळा या प्रकरणाच्या सुनावणीसाठी परमबीर सिंह यांना बोलावले होते, मात्र ते अनुपस्थित राहिले आहेत. त्यामुळे आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना हे वॉरंट जारी करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱयाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले.





























































