सिंधुदुर्गनगरीतील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल – केसरकर

71

सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी

राज्यातील पत्रकारांचे प्रेरणास्थान होईल. या पत्रकार भवनात अद्ययावत सभागृह, सिंधुदुर्गनगरीस भेट देणाऱ्या पत्रकार व पर्यटकांसाठी आठ सूट, व्यापारी गाळे, बाळशास्त्री जांभेकर यांचा पुतळा असं राज्यात आदर्शवत अशा पत्रकार भवनाची उभारणी होईल. कमीत कमी वेळात या पत्रकार भवनाची उभारणी पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे व्यक्त केला.

आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी 11 गुंठे क्षेत्रात या पत्रकार भवनाची उभारणी होत आहे. भूमिपूजन समारंभानंतर येथील जिल्हा नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित मुख्य समारंभात व्यासपीठावर आमदार वैभव नाईक, आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विश्वस्त किरण नाईक, परिषद प्रतिनिधी शशी सावंत, अभिनेते दिगंबर नाईक, सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, जिल्हा माहिती अधिकारी , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.

पत्रकारांना निवृत्ती वेतनाचा शासन निर्णय आठ दिवसात
नवीन जाहिरात धोरण, पत्रकार संरक्षण कायदा आदी मागण्यांबरोबरच पत्रकारांना निवृत्ती वेतन लागू करण्यासाठी गेल्या अधिवेशनात शासनाने पंधरा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा निधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडे वर्ग करण्यात आला असून आठ दिवसात याबाबत शासन निर्णय काढण्यात येईल असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, युती शासन काळातच पत्रकार भवनांची निर्मितीसाठी निधी असो किंवा पत्रकार बांधवांच्या मागण्यांची पुर्तता झाली आहे.

आमदार नितेश राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उभारण्यात येणारे बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवनची इमारत हे भव्य असे स्मारक आहे. कमीत कमी वेळात चांगल्या नियोजनासह या कार्यक्रमाचे आयोजन केल्या बद्दल आयोजकांचे अभिनंदन करतो. कमीत कमी वेळात ही भव्य इमारत उभी रहावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आमदार वैभव नाईक म्हणाले की, सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन हे राज्यात आदर्शवत ठरेल. मराठी वृत्तपत्र सृष्टीसाठी प्रेरणादायी असलेले बाळशास्त्री जांभेकरांचे हे स्मारक सर्वच दृष्टीने वृत्तपत्र सृष्टीतील कार्यरत असलेल्या सर्व मराठी तसेच इतर भाषीक पत्रकारांसाठीही प्रेरणादायी ठरेल.

पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यावेळी म्हणाले की, युती शासनाच्या काळातच पत्रकारांच्या बहुतांश मागण्या पूर्ण होण्या बरोबरच राज्यात विविध जिल्ह्यात पत्रकार भवनांची उभारणी झाली आहे. शासनाने नवीन जाहिरात धोरण, पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांना पेन्शन योजना आदी मागण्या मंजूर केल्या आहेत. त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी.

पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक व पत्रकार भवनाचे महत्व विषद करताना, जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पत्रकारांसाठी बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक महत्वाचे असल्याचे सांगून पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये स्थानिक महत्वाच्या व्यक्तींची स्मारकं उभारण्यात आली आहेत. पण, सिंधुदुर्गमध्ये पत्रकारीतेचे अद्य जनक असलेल्या जांभेकरांचे स्मारक नव्हते. ती उणीव आता भरून निघाली आहे. या स्मारकाचे काम पूर्ण होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे. मतभेद विसरून सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अभिनेता दिगंबर नाईक शुभेच्छापर भाषणात म्हणाले की, सर्व पत्रकार या चांगल्या कामासाठी एकत्र आले याचा मला विशेष आनंद होत आहे. पत्रकारांनी आमच्या बद्दल चांगला लिवुक व्हया इतकीच अपेक्षा आसा, त्यांनी यावेळी ‘हम सब एक है’ ही कविता सादरीकरणाबरोबरच सामुहिक गाऱ्हाणेही घातले.

जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी स्मारकाच्या उभारणीच्या कामास शुभेच्छा दिल्या.

सुरुवातीस जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष यांच्या हस्ते कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. तसेच स्मारक व पत्रकार भवनसाठी सहकार्य केलेल्या प्रशासकीय अधिकारी, वास्तूविषारद व ठेकेदार यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार संघाचे सचिव गणेश जेठे यांनी केले. तर उपाध्यक्ष बाळ खडपकर यांनी आभार प्रदर्शन केले.

आपली प्रतिक्रिया द्या