
गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी रायगड पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी डॉल्बी, डीजेवर बंदी घातली आहे. १४ ते २५ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव तसेच २९ व ३० सप्टेंबर रोजी साखरचौथ गणपतीचे आगमन-विसर्जन होणार आहे. या काळात मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम आणि खाजगी सोहळ्यांमध्ये मयदिपेक्षा अधिक आवाज करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अलिबाग पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे उत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा नियमबाह्य दणदणाट करणाऱ्यांना चाप बसणार आहे.
अलिबाग शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेशोत्सव, साखरचौथ गणपती तसेच अन्य धार्मिक, सामाजिक अथवा खाजगी कार्यक्रमांच्या वेळी नियमबाह्य पद्धतीने डॉल्बी-डीजेचा वापर केल्यास संबंधित आयोजक, चालक किंवा जबाबदार व्यक्तींविरुद्ध कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. गणेशोत्सवाचा उत्साह आणि धार्मिक भावना जपत ध्वनी प्रदूषणमुक्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अंतर्गत ध्वनी प्रदूषणावर निर्बंध आहेत. सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणांचा वापर करताना निर्धारित ध्वनी मर्यादेचे पालन करणे बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
आरोग्याशी खेळ नको
उत्सवाच्या नावाखाली कानठळ्या बसवणारा डीजे-डॉल्बीचा आवाज करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही, असा कठोर पवित्रा अलिबाग पोलिसांनी घेतला आहे.
डेसिबल मर्यादा सकाळी ६ ते रात्री १० रात्री १० ते सकाळी ६
औद्योगिक क्षेत्र ७५ डेसिबल ७० डेसिबल
वाणिज्य क्षेत्र ६५ डेसिबल ५५ डेसिबल
निवासी क्षेत्र ५५ डेसिबल ४५ डेसिबल
शांतता क्षेत्र ५० डेसिबल ४० डेसिबल

























































