
कधी कधी एखाद्याच्या आचरटपणामुळे समोरच्या व्यक्तीला फार मोठे नुकसान सहन करावे लागते. इटलीचे प्रसिद्ध कलाकार मॉरिझियो कॅटेलान यांच्यासोबत असा प्रकार घडला आहे. कॅटेलान यांनी तयार केलेली एक कलाकृती दक्षिण कोरियातील सेऊलमधल्या एका आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. एक पिकलेलं केळं चिकपट्टीच्या सहाय्याने कॅटेलान यांनी भिंतीला चिकटवलं होतं. त्यांनी या कलाकृतीला ‘कॉमेडियन’ असे नाव दिलं होतं.
Leeum Museum of Art मध्ये WE नावाचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. या प्रदर्शनात भिंतीला चिकटपट्टीच्या सहाय्याने केळं चिकटवून कॅटेलान यांनी एक विचित्र कलाकृती तयार केली होती. हे केळं सेऊल विद्यापीठातून प्रदर्शन पाहायला आलेल्या विद्यार्थ्याने चिकटपट्टीतून केळं सोडवत ते खाऊन टाकलं. यानंतर त्याने केळ्याची साल चिकटपट्टीने पुन्हा त्याच जागी चिकटवून ठेवली आणि तो तिथून निघून गेला. नोह हुएन-सू असं या विद्यार्थ्याचे नाव असूनतो जेव्हा केळं खात होता तेव्हा त्याच्या मित्राने ही घटना रेकॉर्ड केली आहे. नोहला जेव्हा विचारण्यात आलं की त्याने असं का केलं, तेव्हा त्याने म्हटलं की तो घरून नाश्ता करून आला नव्हता आणि त्याला भूक लागली होती. नोहने केळं खाऊन साल चिकटवल्यानंतर ती कलाकृती परत दुरुस्त करण्यासाठी तिथे नवं केळं चिकटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. आपण केलेल्या कृतीबद्दल नोहला अझिबात पश्चाताप होत नाहीये. कॅटेलान हा एक विद्रोही कलाकार असल्याचं नोहचं म्हणणं आहे. विद्रोहाविरूद्ध विद्रोह होऊ शकत नाही का ? असा सवाल नोहने विचारला आहे.