
BCCI ने 2026-27 च्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या आगामी हंगामात पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये विविध वयोगट आणि फॉरमॅट अंतर्गत एकूण 1,788 सामने खेळवले जातील. पुरुष क्रिकेटमध्ये सीनियर, U23, U19 आणि U16 अशा चार कॅटेगरीचे सामने होतील, तर महिला क्रिकेटमध्ये U23, U19 आणि U15 वयोगटातील स्पर्धांचे आयोजन केले जाईल. या भव्य क्रिकेट हंगामाचे बिगूल 23 ऑगस्ट 2026 पासून दलीप ट्रॉफीने होणार असून, या स्पर्धेचा अंतिम सामना 10 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. तसेच एका ऐतिहासिक सामन्याचे सुद्धा या हंगामात पुनरागमन होणार आहे.
देशांतर्गत क्रिकेटमधील बहुप्रतीक्षित रणजी ट्रॉफी आणि कर्नल सी.के. नायडू ट्रॉफी यंदाही दोन टप्प्यांत खेळवली जाणार आहे. खेळाडूंना विश्रांतीसाठी पुरेसा वेळ मिळावा, हे उद्धीष्ट डोळ्यांसमोर ठेवत रणजी आणि कर्नल सी.के.नायडू ट्रॉफी दोन टप्प्यांत खेळवली जाणार आहे. दलीप ट्रॉफीनंतर 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान इराणी कप खेळवला जाईल. यानंतर 11 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2026 दरम्यान रणजी ट्रॉफीचा पहिला टप्पा पार पडेल. स्पर्धेचा दुसरा टप्पा 17 जानेवारी 2027 पासून सुरू होईल, तर बाद फेरीचे सामने 9 फेब्रुवारी ते 3 मार्च 2027 या कालावधीत होतील. रणजीच्या एलिट ग्रुपमध्ये 32 संघांची 4 गटात विभागणी करण्यात आली असून, प्लेट ग्रुपमध्ये 6 संघ आपलं नशीब आजमवतील.
🚨 News 🚨
BCCI announces the schedule for the Indian Domestic Season 2026-27, which will feature 1,788 matches across age groups and formats in men’s and women’s cricket.
More Details 🔽 | @IDFCFIRSTBank https://t.co/eWfVBxBNkQ
— BCCI Domestic (@BCCIdomestic) May 20, 2026
रणजी ट्रॉफीच्या दोन टप्प्यांच्या मधल्या काळात मर्यादित षटकांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यानुसार, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टी-20 स्पर्धेचा थरार 14 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, याचे बाद फेरीचे सामने 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. त्यानंतर लगेचच, 14 डिसेंबरपासून विजय हजारे ट्रॉफी वनडे क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेचे नॉकआउट सामने 2 जानेवारी ते 8 जानेवारी 2027 दरम्यान आयोजित केले जातील.
यंदाच्या हंगामात बीसीसीआयने तरुण खेळाडूंना अधिक संधी देण्यासाठी कर्नल सी.के. नायडू ट्रॉफीचे विजेते आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यातील ऐतिहासिक सामना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना 1 ते 4 ऑक्टोबर 2026 दरम्यान खेळवला जाईल. याशिवाय, बोर्डाने टी-20 क्रिकेटवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याच धोरणाचा भाग म्हणून, अंडर-23 स्तरावरील स्टेट ए ट्रॉफी आणि विजी ट्रॉफी या स्पर्धा आता वन-डे फॉरमॅटऐवजी थेट टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवल्या जाणार आहेत.

























































