
गोदापात्रात वाळू माफियांनी हाहाकार उडवून दिला आहे. अवैधरित्या वाळू उपसा करून कमाई करणाऱ्या या वाळू माफियांवर बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा आणि पोलीस अधीक्षक आर.राजा यांनी छापेमारी केली. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत दोन्ही वरिष्ठ अधिकारी गोदापात्रात ठाण मांडून होते. या छापमारीमध्ये वाळूच्या सात गाड्या पकडल्या. या कारवाईने गोदापात्रातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
गोदापात्रामध्ये राक्षसभुवन परिसरात वाळू माफियांचे अवैधरित्या वाळू उपसा सुरू होते. एका तक्रारीवरून थेट आयुक्तांचे आदेश हातात पडले आणि मध्यरात्री बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक आर.राजा गोदापात्राकडे रवाना झाले. अचानक झालेल्या या छापेमारीमुळे एकच खळबळ उडाली. रात्री बारा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत कलेक्टर आणि एसपी राक्षसभुवनच्या गोदापात्रात ठाण मांडून होते. त्यांनी केलेल्या तपासणीत वाळू टेंडर चालकाकडून नियमानुसार उपसा होत नसल्याचे आढळून आले. त्या अनुषंगाने सात वाळूच्या गाड्या ताब्यात घेतल्या आहेत त्यापैकी दोन गाड्या गेवराई तहसील कार्यालयाच्या आवारात तर पाच गाड्या गोदापात्रातच जप्त करण्यात आल्या आहेत. महसूल प्रशासनाकडून या सातही गाड्यांची चौकशी सुरू आहे. कारवाईच्या दरम्यान एका स्कॉर्पिओवर देखील कारवाई करण्यात आहे. दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
गौण खनिज अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी गप्प का?
आयुक्तांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना मध्यरात्री गोदावरीच्या पात्राकडे रवाना व्हावे लागले. हा वाळू उपसा केवळ बुधवारी रात्रीच नव्हता तर अवैधरित्या वाळू उपसा रोज रात्री चालू आहे, यावर कोणाचेच बंधने नाहीत, गौण खनिज अधिकारी यांची ही खरी जबाबदारी आहे. आतापर्यंत एकाही कारवाईमध्ये गौण खनिज अधिकारी यांनीं आपली जबाबदारी बजावलेली नाही. मग गौण खनिज अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी वाळू माफियांच्या विरोधात गप्प का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हे दोन वरिष्ठ अधिकारी थेट कारवाईला सामोरे जात नसल्याने अखेर बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा आणि पोलीस अधीक्षक आर.राजा यांना गोदापात्रात उतरावे लागले.

























































