
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीड जिल्ह्यात शनिवारी अन रविवारी ब्लॉक डाऊनचा आदेश जारी करण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यापार, प्रतिष्ठाने बंदचे आदेश दिले गेले. बीड शहरासह जिल्हाभरात या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली. मात्र जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी मात्र मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः बीड शहरातील भाजी मार्केटमध्ये एकच झुंबड उडाल्याचे चित्र होते.
बीड जिल्ह्यात शनिवार रविवार ब्लॉक डाऊनचा आदेश शुक्रवारी रात्री जारी करण्यात आला. या आदेशाचे पालन अत्यंत शिस्तपूर्वक झाले. संपूर्ण बाजारपेठ प्रतिष्ठान बंद ठेवण्यात आली. कार्यालयात शुकशुकाट होता, रस्ते ओस पडले होते, वाहतूक ठप्प झाली होती, बहुतांश नागरिक घरीच बसून होते. पोलीस प्रशासन गर्दी करू नका असे आवाहन करत होते. नगर रोड, जालना रोड, बार्शी नाका रोड वर सन्नाटा पसरला होता, पेठ बीड भागातही रस्ते निर्मनुष्य होते. प्रशासनाच्या आदेशाच्या काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत होती. बस स्थानकावर तुरळक गर्दी होती. मात्र, अशा परिस्थितीमध्ये बीडमधील भाजी मार्केट मात्र गजबजले होते. फळे, भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होती. गर्दी कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात होता.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात पुण्यात अन मुंबईत कामासाठी गेलेले नागरिक मोठ्या प्रमाणावर परत आले आहेत. मात्र शनिवारी बार रेस्टॉरंट, हॉटेल आणि इतर दुकाने बंद असल्याने रस्ते निर्मनुष्य होते, वडवणीत नागरिक आप आपल्या घरात होते. माजलगाव, गेवराई, केज , परळी, अंबाजोगाई तालुक्यात ब्लॉक डाऊन आदेशाचे पालन जबाबदारीने झाले. सर्व बाजार पेठ, व्यापारी दुकाने, शासकीय कार्यालये बंद होती. माजलगावामध्ये खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने अन कापड दुकान उघडी होती, माजलगाव मधील हनुमान चौकात नागरिकांनी विनाकारण गर्दी केली ती गर्दी हटवण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरले, वैद्यनाथ, योगेश्वरी देवीचे दर्शन या पूर्वीच बंद करण्यात आले, पान टपऱ्या, हॉटेल बंद असल्याने प्रवाशांना पाणी सुद्धा उपलब्ध होत नव्हते. गेवराईमध्ये कडेकोट पालन झाले. बीड जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यात ब्लॉक डाऊन पाळण्यात आला. नगरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद होती. रस्त्यावरील हॉटेलही बंद होती. शिरूर शहरातील कालिका देवी दर्शन बंद करण्यात आले. शिरूर शहरात दिवसभर सन्नाटा होता. मांजरसुभा, गडी, तेलगाव चौफाळे निर्मनुष्य होते.
रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत राबवल्या जाणाऱ्या जनता कर्फ्युची तयारी पूर्ण झाली आहे. या कर्फ्युमध्ये सहभागी होण्यासाठी आजच जीवनावश्यक वस्तू खरेदी करून ठेवल्या जात आहेत. बीडमध्ये रविवारी आठवडी बाजार असतो, तो भरणार नसल्याने लोक खरेदीसाठी गर्दी करत असल्याचे समोर येत आहे.

























































