भयंकर! नराधमाने साखर झोपेत असलेल्या पत्नी व मुलाचा कुऱ्हाडीने गळा चिरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथे एका तरुणाने आपली पत्नी व पाच वर्षांच्या मुलाची साखर झोपेत असताना कुऱ्हाडीने हत्या केली. मंगळवारी दि.11 रोजी पहाटे ही घटना घडली. हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिसांना आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. पांडुरंग शिवाजी दोडतले (वय 25 वर्ष) असे नराधमाचे नाव आहे, त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

माजलगाव तालुक्यातील मंजरथ येथे काळे वस्ती असून तेथे शिवाजी दोडतले हे शेतकरी राहतात. त्यांच्यासोब त्यांचा मुलगा पांडुरंग व त्याची पत्नी लक्ष्मी व त्यांची तीन मुले राहायची. लक्ष्मी मागील दोन महिन्यांपासून कौटुंबिक वादामुळे माहेरी लहामेवाडी येथे वडील शिरू गणपती शेंडगे यांच्याकडे राहत होती. वडील रविवारी कर्नाटक येथे ऊसतोडणीसाठी गेले व त्यांनी लक्ष्मीला सोमवारी दुपारी नवऱ्याकडे आणून सोडले होते.

त्यानंतर अवघे काही तास उलटताच मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास लक्ष्मी व तिची मुले साखर झोपेत असताना पांडुरंग याने लक्ष्मी व मोठा पाच वर्षांचा मुलगा या दोघांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले त्यात दोघेही जागीच ठार झाले. या घटनेनंतर आरोपीने ग्रामीण पोलीस ठाण्यात आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश खटकळ,उपनिरीक्षक विजयसिंह जोनवाल हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. या हत्येमागे कौटुंबिक वाद असू शकतो असा पोलिसांचा कयास आहे.