बीडच्या शिक्षिकेची नेत्रदीपक कामगिरी, अभ्यासाच्या 1500 व्हिडीओंना जगभरातून पसंती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीड येथील शिक्षिका उषा ढेरे यांनी ज्ञानार्जनाचे काम कोरोना काळात सुरू ठेवले. वर्षभरात उषा ढेरे यांनी प्राथमिक शिक्षणाचे 1500 व्हिडीओ अपलोड केले. त्यांच्या चॅनेलला सुमारे साडेचार लाख सबक्रायबर असून त्यांचे व्हिडीओ देश-विदेशातील 18 कोटी विद्यार्थ्यांनी बघितले आहेत.. ऑनलाइन शिक्षणाच्या संकटातही संधी शोधण्याचे काम उषा ढेरे या शिक्षिकेने केले.

बीड जिल्ह्यातील ढेकणमोहा येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये उषा ढेरे शिकवतात. समाजशास्त्र आणि इंग्रजीमध्ये एम. ए. झालेल्या उषा ढेरे यांनी स्टडी फ्रॉम होमच्या काळात आपले काम अतिशय प्रामाणिकपणे केले. त्यांनी गावागावांतील विद्यार्थ्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून शिक्षण दिले.

उषा ढेरे एकेकाळच्या 700 पटाच्या ढेकणमोहा जिल्हा परिषदेच्या शाळेत अनेक वर्षांपासून ज्ञानार्जनाचे काम करत आहेत. 700 पटाची शाळा एक वेळा दोन पटावर आली. त्याच वेळी याच शाळेवर ढेरे रुजू झाल्या. आपल्या कौशल्याने त्यांनी दोन पटांची शाळा 70 विद्यार्थ्यांवर नेऊन ठेवली. घरघर लागलेल्या शाळांना संजीवनी देण्याचे काम ढेरे यांनी केले.

1500 व्हिडीओंच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम ढेरे यांनी केले. शिक्षणासोबतच त्यांचे साहित्यही भरपूर आहे. एक हजार चारोळ्या, 300 निरजा काव्य, 200 कविता, 25 काव्यांजली काव्य, 30 बालकाव्य, 10 देशभक्तिपर गीते, 5 पोवाडे, 4 अभंग असे साहित्य त्यांनी निर्माण केले.