
देशातील नीट, सीबीएसई आणि सीयूईटी परीक्षांमधील गोंधळ आणि पेपर फुटीच्या विरोधात आता सोशल मीडियावरून सुरू झालेले आंदोलन थेट रस्त्यावर उतरणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे 6 जून रोजी अमेरिकेतून हिंदुस्थानात परतणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतरवर तीव्र आंदोलन करण्याची घोषणा दीपके यांनी केली आहे. तत्पूर्वी त्यांनी कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांना फोन केला होता. याबाबत सरोदे यांनी स्वत: एक्सवर पोस्ट करत माहिती दिली आहे.
कॉक्रोच जनता पक्षाचा प्रणेता अभिजित दिपके याचा आज सकाळी मेसेज आला. वेळ ठरल्याप्रमाणे मग त्याचा कॉल आला. अभिजितने हिंदुस्थानात यायचे नक्कीच केले आहे. जेलमध्ये टाकले तरीही चालेल पण आता क्रांती झाली पाहिजे असे तो म्हणाला, अशी माहिती सरोदे यांनी एक्स पोस्टमधून दिली.
ते पुढे म्हणाले, शिव-शाहू-फुले आंबेडकर यांच्या विचारांची साथ न सोडता गरज असल्यास आंदोलन करावे व त्यासाठी महात्मा गांधींनी सांगितलेला अहिंसक परिवर्तनाचा मार्ग वापरावा हे माझे म्हणणे त्याला पटले. मी तसेच मत सर्व चॅनेल्स वर मांडतोय असे अभिजिने सांगितले.
केवळ सत्ता बदल म्हणजे परिवर्तन नाही तर लोकशाही व्यवस्थांवर पारदर्शकपणे लोकांचे प्रश्न प्राधान्यक्रमाने सोडविण्याची जबाबदारी आणि लोकाभिमुख शासन यासाठी काम करावे लागेल असे माझे मत सुद्धा मी स्पष्ट केले. शांततामय मार्गाने परिवर्तनाची आस असलेला झुरळप्रमुख 6 तारखेला हिंदुस्थानात पाय ठेवतोय. अब खुर्ची खाली करो के जनता आ रही है! अशा इशाराही सरोदे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

ऑनलाईन याचिकेवर 8 लाख सह्या
धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी दीपके यांनी पक्षाच्या वेबसाईटवर ऑनलाईन याचिका अपलोड केली आहे. ‘‘आमच्या याचिकेवर आतापर्यंत 8 लाख लोकांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत,’’ अशी माहिती त्यांनी दिली.



























































