
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मैदानावर व मैदानाबाहेर झालेल्या अनेक घटना गाजलेल्या आहेत. आता त्यात आणखी एका घटनेची भर पडली आहे. हॉकीमध्ये पराभवानंतर खेळाडूंच्या डोक्यावरून बळजबरीने वस्तरा फिरवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर या प्रकरणी चौकशी करण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे.
जबलपूर येथे ज्युनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये बंगालच्या अंडर-19 संघाचा सामना नामधारी एकादशशी झाला. सामना सुरू असताना हाफ टाईमला प्रशिक्षक आनंद कुमार यांनी खेळाडूंना सामना हरल्यास मुंडन करण्यात येईल असे म्हटले. या सामन्यात बंगालच्या संघाला 1-5 असा पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर कोलकाताला परतल्यावर खेळाडूंनी मुंडन केले. तसेच काही खेळा़डूंनी आमच्याकडून जबरदस्तीने मुंडन करून घेतल्याचा आरोप केला. परंतु प्रशिक्षक आनंद कुमार यांनी मी त्यांना रागावलो होते, परंतु असे काहीही म्हटले नसल्याचे सांगितले.
दरम्यान, या खेळाडूंचा मुंडन केलेला फोटो व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना गंभीर असून या प्रकरणी तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे बंगाल हॉकी असोसिएशनचे सचिव स्वप्न बॅनर्जी यांनी सांगितले.

























































