
>> सुजाता बाबर
‘बीटा पिक्टोरिस बी’ हा थेट छायाचित्रात टिपला गेलेल्या पहिल्या काही बाह्यग्रहांपैकी एक आहे. या ग्रहाचे परिवलन हा बऱयाच काळापासून कुतूहलाचा विषय राहिला आहे.
आपल्या पृथ्वीवर दिवस-रात्र होण्यासाठी 24 तास लागतात. गुरूवर हा कालावधी सुमारे 10 तासांचा आहे; पण पृथ्वीपासून सुमारे 63 प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका तरुण परग्रहावर दिवस आणखी वेगाने सरकतो. तेथील एक दिवस फक्त सुमारे नऊ तासांचा आहे! हा ग्रह म्हणजे बीटा पिक्टोरिस बी. या विलक्षण ग्रहाकडे खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष आधीपासूनच होते; मात्र 2026 मधील जेम्स वेब अवकाश दुर्बिणीच्या नव्या निरीक्षणांनी त्याच्या वातावरणाच्या हालचाली आणि परिवलनाविषयी महत्त्वाची नवी माहिती उघड केली आहे. बीटा पिक्टोरिस बी हा एक ‘सुपर-ज्युपिटर’ आहे, म्हणजेच गुरू ग्रहापेक्षा जास्त वस्तुमान असलेला एक वायूचा महाकाय ग्रह. तो बीटा पिक्टोरिस नावाच्या, अंदाजे 20 ते 25 दशलक्ष वर्षे वयाच्या तरुण ताऱयाभोवती प्रदक्षिणा घालतो. त्याच्या तुलनेने तरुण वयामुळे या ग्रहाने त्याच्या निर्मितीच्या काळातील लक्षणीय उष्णता अजूनही टिकवून ठेवली आहे. विविध निरीक्षणांवरून असे दिसून येते की, त्याचे तापमान सुमारे 1700 केल्विन आहे. या उष्णतेमुळे हा ग्रह तीव्र अवरक्त किरणोत्सर्ग उत्सर्जित करतो, ज्यामुळे त्याचे थेट छायाचित्रण करणे शक्य होते. बीटा पिक्टोरिस बी हा थेट छायाचित्रात टिपला गेलेल्या पहिल्या काही बाह्य ग्रहांपैकी एक आहे.
2014 मध्ये, ‘युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरी’च्या व्हेरी लार्ज टेलिस्कोपवरून उच्च-रिझोल्युशन स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करून या ग्रहावरील दिवसाचा कालावधी अंदाजे आठ तास असल्याचे मोजण्यात आले. त्यावेळी या ग्रहाच्या विषुववृत्तीय भागाचा वेग ताशी जवळपास एक लाख किलोमीटर इतका असल्याचे आढळून आले. याचा अर्थ असा की, ‘बीटा पिक्टोरिस बी’ हा आपल्या सूर्यमालेतील कोणत्याही ग्रहापेक्षा कितीतरी अधिक वेगाने परिवलन करतो. आता जेम्स वेब अवकाश दुर्बिणीने या परिवलनाकडे वेगळ्या पद्धतीने पाहिले. संशोधकांनी या ग्रहाचे सुमारे 16 तास सलग निरीक्षण केले. ‘एफ210एम’ आणि ‘एफ410एम’ या दोन अवरक्त पट्टय़ांमध्ये ग्रहाच्या तेजामध्ये अतिशय सूक्ष्म, नियमित बदल आढळले. ग्रह फिरताना त्याच्या वातावरणातील वेगवेगळे ढग, तापमानातील फरक किंवा असमान भाग आपल्या दृष्टीसमोर येतात आणि त्यामुळे ग्रहाच्या चमकण्यात किंचित चढ-उतार होऊ शकतात. या बदलांच्या लयीतून संशोधकांनी 9.00 औ 0.13 तासांचा फिरण्याचा कालावधी निश्चित केला.
या निरीक्षणाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, दोन्ही अवरक्त पट्टय़ांमध्ये बदलाचा जवळपास सारखाच पॅटर्न दिसून आला. यावरून हा निष्कर्ष अधिक दृढ होतो की, हा सिग्नल ग्रहाच्या वातावरणातीलच एका असमान रचनेतून निर्माण झाला आहे. दुसऱया शब्दांत सांगायचे तर, ‘बीटा पिक्टोरिस बी’ या ग्रहाचे वातावरण एकसमान, स्थिर किंवा गुळगुळीत नाही. तिथे ढग, तापमानातील तफावत किंवा रासायनिक रचनेतील स्थानिक फरक असण्याची शक्यता आहे. या निरीक्षणाने केवळ त्या दूरच्या ग्रहावरील ‘दिवसाचा’ कालावधी मोजणेच शक्य केले नाही, तर त्याच्या वातावरणातील घडामोडींची झलकही दाखवून दिली. या संशोधनातून ग्रहाच्या जन्माविषयीही महत्त्वाचे संकेत मिळतात. बीटा पिक्टोरिस बीचा फिरण्याचा अक्ष, त्याची कक्षीय पातळी, त्याच्या ताऱयाभोवती असलेली धुळीची अवशिष्ट चकती आणि ताऱयाचा विषुववृत्तीय भाग हे सर्व जवळजवळ एकाच दिशेने संरेखित असल्याचे निरीक्षण सुचवते. संशोधकांच्या मते हा नमुना ग्रहाची निर्मिती ताऱयाभोवतीच्या चकतीतून पदार्थ हळूहळू जमा होत जाणाऱया केंद्रक- वृद्धी प्रक्रियेत झाली असण्याच्या कल्पनेला स्वतंत्र गतिशास्त्राrय आधार देतो. बीटा पिक्टोरिसची गंमत येथेच संपत नाही. 2026 मध्ये याच तारकासमूहाभोवती आणखी एक बीटा पिक्टोरिस डी शोधण्यात आला. त्यामुळे या तरुण प्रणालीभोवती आता किमान तीन ज्ञात ग्रह असल्याचे समोर आले आहे. बीटा पिक्टोरिस बीचे नव्या पद्धतीने केलेले निरीक्षण आणि त्याच प्रणालीतील नव्या ग्रहाचा शोध यामुळे ग्रहव्यवस्थेच्या निर्मितीचा अभ्यास करण्यासाठी हे तारकासमूह एक अद्वितीय नैसर्गिक प्रयोगशाळा बनले आहे.
एका दूरच्या ग्रहाचा दिवस किती मोठा आहे हे मोजणे वरवर पाहता साधे गणित वाटू शकते; पण त्या नऊ तासांच्या चक्रात ग्रहाचे परिवलन, वातावरणातील ढग, रासायनिक रचना आणि त्याच्या जन्माची कहाणी दडलेली आहे. परग्रहांचे थेट छायाचित्र काढणे ही केवळ सुरुवात आहे; त्यांच्या प्रकाशातील सूक्ष्म चढ-उतार वाचले तर त्या दूरच्या जगांचे हवामान आणि गतिशीलताही उलगडता येऊ शकते.
(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)
























































