म्हणे रामाची नियतच खराब होती, भाजपा आमदार गोरे यांची बेछूट बडबड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या नावाने मतांचे राजकारण करणाऱया भाजपच्याच आमदाराने साक्षात प्रभू श्रीरामावर मुक्ताफळे उधळली आहेत. खटाव तालुक्यातील सातेवाडी येथे जाहीर सभेत बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी बेछूट बडबड केली. स्वतःची स्तुती करताना रामायणाचा दाखला देताना गोरे यांनी, ‘रामाची नियतच खराब होती,’ असे संतापजनक वक्तव्य केले.

आमदार गोरे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. आता भाजप आपल्या आमदारावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वडूजजवळील सातेवाडी येथे आयोजित जाहीर सभेत आमदार जयकुमार गोरे यांना नेहमीप्रमाणेच आत्मप्रौढी सांगण्याचा मोह आवरला नाही. त्या नादात त्यांनी उपस्थितांना रामायणातील दाखला दिला, ‘राम-रावण युद्धात घायाळ होऊन रावण रणांगणावर कोसळला. त्यावेळी त्याने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी प्रचंड सेना असताना तू जिंकलास कसा? त्यावर राम म्हणाला, तुझा भाऊ बिभीषण माझ्याकडे होता म्हणून मी जिंकलो!’ इतके सांगून झाल्यावर आमदार गोरे म्हणाले, ‘माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो. कारण रामाची नियत खराब होती.’ हे अधोरेखित करण्यासाठी त्यांनी हेच वाक्य पुन्हा एकदा उच्चारले. दोनदा बेछूट बडबड केल्यानंतर आमदार गोरे यांना उपस्थितांनी चूक लक्षात आणून दिली. गोरे यांच्या या संतापजनक वक्तव्यामुळे त्यांच्यासह भाजपवर चोहोबाजूंनी टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. सत्ता असेल तिकडे जाणाऱया गोरे यांनी 2019मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना क्षणात रामराम करून निष्ठsची फुले देवेंद्र फडणवीसांच्या चरणी वाहिली. भाजपनेही अशा लोकांना पावन करून घेतले. पण ज्या प्रभू श्रीरामाच्या नावावर राजकारण करायचे, त्याच श्रीरामावर आमदार जयकुमार गोरे यांनी मुक्ताफळे उधळल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या जाहीर कार्यक्रमाला भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

शिवसेनेने पाठविली ‘रामायणा’ची प्रत

प्रभू श्रीरामाबाबत बेछूट बडबड करणाऱया आमदार जयकुमार गोरे यांचा शिवसेनेने जाहीर निषेध केला आहे. ‘आमदार गोरे यांच्यासह भाजपच्या सर्वच आमदारांना ‘रामायण’ ग्रंथाचे पठण करण्याची गरज आहे,’ असा टोला शिवसेना प्रवक्त्या, आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी हाणला आहे. ‘रामायण, महाभारत हे हिंदूंचे पवित्र ग्रंथ असून, त्यांची बदनामी सहन केली जाणार नाही,’ असा इशाराही त्यांनी दिला. ‘प्रभू श्रीरामांचा अनादर म्हणजे हिंदुस्थानी संस्कृतीचा अपमान आहे, असे बजावत मनीषा कायंदे यांनी गोरे यांना पोस्टाद्वारे ‘रामायणा’ची एक प्रत पाठविली.