भैरवगड यात्रा रद्द, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातगाव मंडळाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या भैरवगड येथील भैरवनाथ मंदिरात 24 मार्च रोजी पूर्वनियोजित असलेली वार्षिक यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करत असल्याची घोषणा सातगाव मंडळाने केली आहे या यात्रेला रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील भाविक गर्दी करत असतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सातगांव मंडळाकडून सांगण्यात आले आहे.

संगमेश्वर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या भैरवगडावर भैरीभवानीचे मंदीर आहे. या मंदिरात बारमाही तिथीत अनेक छोटे-मोठे कार्यक्रम केले जातात. या ठिकाणी सोयीसुविधा नसताना देखील अनेक पर्यटक हजेरी लावतात. पाडव्याच्या आदल्या दिवशीच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्व असते. या यात्रेला महाराष्ट्रातून अनेकजण हजेरी लावतात. मात्र या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नियोजीत यात्रा रद्द करण्यात आली आहे. सातगावच्या पुजाऱ्यांच्या माध्यमातून त्या दिवशी फक्त मंदिरात पूजा केली जाणार असून महाराष्ट्रातून येणाऱ्यांनी भैरवगडावर प्रवेश करु नये, असे आवाहन भैरवगड सातगाव मंडळाने केले आहे

सातगाव मानकरी मंडळात रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील येडगेवाडी, रातांबी, गोवळ, पाते, मजुत्री तर सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील पाथरपुंज व गावडेवाडी या गावांचा समावेश आहे. भैरवगाडावरील बारमाही तिथी प्रथापरंपरेनुसार केल्या जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी सातगाव मंडळाच्या पुजाऱ्यांसोबत चर्चा करत भैरवगडावर गर्दी न करण्याची व आवश्यक ती खबरदारी घेण्याची सुचना केली आहे. भैरवगडावरील पाडव्याच्या आदल्या दिवशीचा वार्षिक यात्रा हा सर्वात मोठा कार्यक्रम होतो. या वर्षीचा यात्रा कार्यक्रम रद्द करण्यासंदर्भात सातगाव मंडळाने एकमताने ठराव केला आहे तर भाविकांनी गर्दी न करण्याचे तसेच जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश पाळण्याचे आवाहन केले आहे.