भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
chandrashekhar-azad-bhim-ar

सामना ऑनलाईन, मुंबई

जाहीर सभा घेण्यासाठी मुंबईत दाखल झालेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. पोलिसांनी सकाळपासून आझाद यांच्या हालचालींवर वॉच ठेवल्यानंतर सायंकाळी त्यांना चैत्यभूमी येथून ताब्यात घेतले. त्यांना पोलिसांच्या गाडीतून नेण्यात आल्याने भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे.

वरळीच्या आझाद मैदानावर भीम आर्मीची जाहीर सभा होणार आहे. त्या सभेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सभेसाठी चंद्रशेखर आझाद मुंबईत दाखल झाल्यानंतर मालाडचा मनाली हॉटेलमध्ये थांबले होते. आझाद मनाली हॉटेलमध्ये असल्याचे कळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. आझाद यांना चैत्यभूमीवर जायचे होते पण पोलिसांनी मज्जाव केला. हे कळताच भीम आर्मीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या दिशेने धाव घेतली तेव्हा तेथे कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक चकमकदेखील झाली. यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, सायंकाळी आझाद यांना चैत्यभूमीवर जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार आझाद सायंकाळी साडेआठच्या सुमारास चैत्यभूमीवर आले पण त्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनदेखील करू न देता पोलिसांनी  ताब्यात घेतले आणि गाडीत बसवून नेले. हा अन्याय असून आमच्या स्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचा संताप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. आझाद यांना पत्रकार परिषद देखील घेऊ दिली जात नाही परंतु बाकीच्यांना सभा घेण्यासाठी बरोबर परवानगी दिली जाते असा घणाघात सीपीआय (एम)चे केंद्रीय समिती सदस्य डॉ. अशोक ढवळे यांनी केला.