चार महिन्याच्या बाळाचा गळा चिरला, मृतदेह घेऊन पोलिसांकडे गेला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। भोपाळ

मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यातील सिंगपूर गावात सोमवारी एका पित्याने चार महिन्याच्या बाळाचा गळा चिरून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह घेऊन तो पोलीस ठाण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून पत्नीच्या तक्रारीवरून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तीरथ वर्मन (३२) असे आरोपीचे नाव असून य़शवंत असे मृत बालकाचे नाव आहे.

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा तीरथला संशय होता. सोमवारी दुपारी याच मुद्द्यावरून तीरथ व त्याच्या पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी यशवंत हा माझा मुलगा नसल्याचा त्याने आरोप केला. हे ऐकून पत्नीने रागात जर तो तुझा मुलगा नाहीये तर मग त्याला कापून फेकून दे असे म्हटले. हे ऐकताच तीरथचा रागाचा पार चढला. त्याने पाळण्यात झोपलेल्या यशवंतला उचलले व घरातील धारदार चाकू घेऊन तो घराबाहेर पडला. हे बघताच पत्नीही त्याच्या मागे धावत गेली. पण पोलीस ठाण्याजवळ य़ेताच तीरथने चाकूने यशवंतचा गळा चिरला. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात येत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी तात्काळ यशवंतला रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.