
सिमेंट–काँक्रीटच्या वाढत्या जंगलामुळे पर्यावरणाची हानी होत आहे. पृथ्वीवरील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हळूहळू जंगले नष्ट झाल्याने प्राण्यांचा अधिवास धोक्यात आला असून अधूनमधून त्यांचा मानव वस्तीत शिरकाव होऊ लागला आहे. वेळीच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पावले उचलली नाहीत तर भविष्यात याची मोठी किंमत मानवाला मोजावी लागेल. या पार्श्वभूमीवर ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश नागरिकांना देण्यासाठी पश्चिम बंगालचा प्रसनजीत दास या तरुणाने पुढाकार घेतला आहे. सध्या हा तरुण सायकलवरून देशभ्रमंती करून पर्यावरणाविषयी जनजागृती करतोय.
मूळच्या पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद तालुक्यातील प्रसनजीतने 25 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल येथून या मोहिमेला सुरुवात केली. आपल्या मोहिमेविषयी तो म्हणाला, ‘‘आजवर मी उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानात सायकलवरून तब्बल 11 हजार किमीचा प्रवास केला आहे. देशभर फिरून पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचे माझे उद्दिष्ट आहे. पर्यावरण संवर्धनासोबत वर्षातून किमान दोन वेळा रक्तदान करा तसेच पाण्याची बचत करा याबाबतदेखील नागरिकांना आवाहन करीत आहे.’’

























































