मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजप-जेडीयू आमनेसामने, मुख्यमंत्र्यांनी केली भूमिका स्पष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बिहारमध्ये सत्ताधारी पक्ष जनता दल युनाटडेट (जेडीयू)ने अनेक आमदार खासदार झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर नवीन मंत्र्यांची वर्णी लागली. रविवारी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंत्रिमंडळ विस्तार केला. मुख्यमंत्र्यांनी जेडीयूच्या 8 आमदारांना मंत्रिपद दिले, परंतु भाजपकडे मात्र दुर्लक्ष केले. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपला एकही मंत्रिपद मिळालेले नाही. याबाबत नितीश कुमार यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी सर्व काही सुरळीत असल्याचे म्हटले.

भविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जनता दल युनाटडेट (जेडीयू)च्या सहभागाच्या शक्यता आता संपल्या आहेत. त्यामुळे आता भविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी रविवारी स्पष्ट केले. याआधी सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने मंत्रिमंडळात जेडीयू एक मंत्रीपद देऊ केले होते. सत्तेतील भागीदारीसाठी द्यायचे म्हणून एक मंत्रीपद नको, अशी भूमिका पक्षाच्या कोअर टीमने घेतली होती. जेडीयू आता कधीच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असे जेडीयूचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले होते.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पक्षाने मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने राज्यात नवीन राजकीय समिकरणं बनणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच जेडीयूने बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणीही पुन्हा एकदा रेटून धरली आहे. तसेच कलम 370, अयोध्येतील राम मंदिर उभारणी आणि तीन तलाक व समान नागरिकतेच्या मुद्द्यावरून जेडीयूने नेहमची भाजपपेक्षा वेगळी भूमिका घेतली आहे. तसेच मंत्रिमंडळात सहभागी न होणे, बिहारच्या मंत्रिमंडळामध्ये भाजपला स्थान न मिळणे यामुळे दोन्ही पक्षांमध्ये संबंध पहिल्यासारखे नसल्याचे संकेत मिळत आहेत.

जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे की पुढच्या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात सहभागी होऊन बिहारच्या नागरिकांसोबत न्याय होणार नाही. जेडीयू नाराजही नाही आणि संतुष्टही नाही. भाजपला आमच्या स्थितीबाबत माहिती असल्याचेही ते म्हणाले.