बिहारमध्ये 3 टप्प्यात निवडणुका होणार, 10 नोव्हेंबरला निकाल लागणार

बिहार विधानसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम शुक्रवारी जाहीर करण्यात आला. बिहारमध्ये 3 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान 28 ऑक्टोबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान 3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यानंतर देशात होणारी ही पहिली सार्वत्रिक निवडणूक आहे. यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोगाने काही मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. यामध्ये म्हटलंय की उमेदवाराला फक्त 5 जणांसोबत घरोघरी प्रचारासाठी जाण्याची परवानगी असेल. तसेच नामांकन अर्ज आणि अनामत रक्कम ऑनलाईन भरावी लागणार आहे.

निवडणूक आयोगाच्या नव्या सूचनेनुसार नामांकन देताना उमेदवारासोबत फक्त दोन जणांना आणि दोन गाड्यांना परवानगी असणार आहे. मतमोजणीवेळी हॉलमध्ये 7 पेक्षा अधिक डेस्क नसणार. तसेच एका विधानसभा मतदारसंघात 3 ते 4 मतमोजणीचे हॉल असतील. निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठी  6 लाख पीपीई किट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही पीपीई किट राज्य निवडणूक आयोगाकडे सोपवण्यात येणार आहेत. याशिवाय 46 लाख मास्क,7 लाख हँड सॅनिटायझरच्या बाटल्याही दिल्या जाणार आहेत. कर्मचाऱ्यांसाठी 6 लाख फेसशिल्डही दिली जाणार आहेत. बिहारमध्ये 18 लाखांहून अधिक प्रवासी मजूर आहेत, ज्यातील 16 लाख मतदार मतदान करू शकतील.  80 वर्षांच्या वरील मतदारांना पोस्टल बॅलेटने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या