हाजीपूरमध्ये धान्याचा ट्रक उलटला; लूट रोखण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना जमावाची मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारच्या हाजीपूरमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 322 वर रविवारी संध्याकाळी धान्याने भरलेला ट्रक उलटला. धान्याच्या ट्रक उलटल्याचे स्थानिकांना समजताच त्यांनी धान्याच्या गोण्यांची लूट सुरू केली. लूट रोखण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना जमावाने मारहाण केली आणि धान्यांच्या गोण्या पळवल्या. घटनास्थळी पोलीस पोहचल्यावर त्यांनी धान्याची लूट करणाऱ्यांना रोखले आणि धान्याच्या लुटलेल्या गोण्या जप्त केल्या.

गौरौल येथील एफसीआयच्या गोदामातून धान्य भरून ट्रक महनारकडे जात होता. त्यावेळी हाजीपूरमधील सतपुरा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग 322 वर संध्याकाळी ट्रक उलटला. धान्याचा ट्रक उलटल्याचे समजताच धान्याच्या गोण्या पळवण्यासाठी स्थानिकांची गर्दी झाली. काही अधिकाऱ्यांनी धान्याची लूट करणाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता जमावाने त्यांना मारहाण केली. घटनेची माहिती मिळाताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी धान्याची लूट करणाऱ्यांना रोखले. तसेच आसपासच्या गावांमध्ये छापा टाकला. त्यात धान्याची लूट केलेल्यांना अटक करण्यात आली आणि त्यांनी लुटलेले धान्यही जप्त करण्यात आले.

नियमानुसार रात्रीच्यावेळी सरकारी धान्याची वाहतूक करता येत नाही, असे असताना हा ट्रक महनारकडे कसा जात होता, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. तसेच धान्याची वाहतूक रात्री का करण्यात येत होती, याची माहिती घेण्यात येत आहे. ” एफसीआयच्या गोदामातील धान्य घेऊन निघालेला ट्रक सतपूर गावाजवळ उलटला होता. त्यानंतर स्थानिकांनी धान्याची लूट केली. त्यांना रोखण्यात आले. तसेच त्यांनी लुटलेले धान्यही जप्त करण्यात आले आहे. धान्याची लूट रोखण्यासाठी गेलेल्या काही अधिकाऱ्यांना जमावाने मारहाण केली. पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे,” अशी माहिती वैशालीचे एसडीएम संदीप प्रियदर्शी यांनी दिली.