महाविकास आघाडीच्या समोर भाजपचा पराभवच होतो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सत्तेत असणारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा भाजपचा पूर्णतः पराभव होतो हे विधानपरिषद निवडणुकीत दिसून आले आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीतही अशीच स्थिती होणार असल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार संजय शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, राजन पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील पानीवकर आदी उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित आली आणि त्यांनी भाजपाला पराभूत केले आहे. आताही तशीच स्थिती आहे. महाविकास आघाडी एकत्रित आली की भाजपाचा पराभव होतो याची पक्की जाण असल्याने प्रशांत परिचारक यांनी मला उमेदवारी नको, म्हणून समाधान आवताडे यांना तिकीट द्यायला लावले आहे. तरीही सांगतो निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत 3 एप्रिलपर्यंत आहे, आपण तोवर वाट पाहू. तोवर काही बोलायचे नाही असे ठरविल्याचे जयंत पाटील यांनी आमदार संजय शिंदे यांच्याकडे पाहून म्हटले. आता महाविकास आघाडी झाली असली तरी मागील निवडणुकीत आमदार परिचारक व आवताडे यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. यामुळे दोन्ही गटांचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.

भाजपमध्ये बंडखोरी; भाऊबंदकी

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्याविरोधात त्यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनीच दंड थोपटल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सिद्धेश्वर आवताडे यांचे मंगळवेढा तालुक्यात मोठे राजकीय वलय आहे. या उमेदवारीवर समाधान आवताडे यांनी ‘घर का मामला है, लवकरच मिटेल,’ असा विश्वास व्यक्त केला आहे.

38 उमेदवारांचे 44 अर्ज दाखल

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी तब्बल 38 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मंगळवारी शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत एकूण 38 उमेदवारांचे 44 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 3 एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत असून, या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे.