
हिमाचल प्रदेशमध्ये तीन विधानसभा आणि एक लोकसभा पोटनिवडणूकीत सत्ताधारी भाजपचा दारुण पराभव झाला आहे. महागाईमुळेच भाजपचा पराभव झाल्याची कबुली मुख्यमंत्री जयराम ठाकुर यांनी दिली आहे. तसेच ही पक्षासाठी धोक्याची घंटा असल्याचा इशारा भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिला आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये मंडी या लोकसभा मतदारसंघात आणि फतेहपूर, अर्की आणि जुबल कोटखाही या विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. या चारही जागी काँग्रेसने विजय मिळवला आहे. फतेहपुर आणि अर्की या जागांवर काँग्रेसने पुन्हा विजय मिळवला परंतु जुबल कोटखाही या जागेवर काँग्रेसने उमेदवाराने भाजप उमेदवाराचा पराभव केला आहे.
जुबल कोटखाई मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नीलम सेराईक यांना अवघे 2 हजार 644 मतं मिळाली आहेत. तर काँग्रेस उमेदवार रोहित ठाकूर यांना 29 हजार 555 मते मिळाली आहेत. भाजप उमेदवाराची अनामत रक्कमही जप्त झाली आहे.
मंडी लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी भाजप उमेदवार कौशल ठाकूर यांचा 7 हजार 490 मतांनी पराभव केला. भाजप कार्यकर्त्यांनी पक्षविरोधात काम केल्याचा आरोप मुख्यममंत्री जयराम ठाकूर यांनी केला आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की या पराभवाचा पक्ष आत्मचिंतन करेल. महागाईमुळे पक्षाचा पराभव झाला असून विरोधी पक्षाने हा मुद्दा धरून लावल होता, जनतेने नव्हे तर महागाईने पक्षाचा पराभव केला असेही ठाकूर म्हणाले.
भाजपचे वरिष्ठ नेते मुरलीधर राव यांनी ही धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे. या पराभवाचे नेमके कारण शोधणे गरजेचे आहे. तसेच पुढल्या वर्षी राज्याची निवडणूक असल्याने हा पराभव म्हणजे पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी एक धोक्यांची घंटा असल्याचे त्यांनी सांगितले.

























































