
ससून रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच भाजप आमदार सुनील कांबळे यांनी एका पोलीस शिपायाच्या कानशिलात लगावली. कांबळे यांची दादागिरी एवढय़ावरच थांबली नाही, तर त्यांनी अजितदादा गटाच्या एका पदाधिकाऱयाच्याही कानशिलात मारली. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
अजित पवार यांनी आज ससून रुग्णालयातील तृतीयपंथी वॉर्डबरोबरच विविध विकासकामांचे उद्घाटन केले. कार्यक्रमपत्रिकेत आणि कोनशिलेवर स्थानिक आमदार म्हणून आमदार सुनील कांबळे यांचे नाव नसल्याने ते यावेळी संतप्त झाले. या कार्यक्रमा दरम्यान अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख जितेंद्र सातव यांचा दोन वेळा आमदार कांबळे यांना धक्का लागला होता. त्यामुळे कांबळे यांनी सातव यांच्या कानशिलात लगावली. कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरून खाली उतरत असताना आमदार कांबळे यांनी त्या ठिकाणी सुरक्षा सेवा बजावीत असलेले शिवाजी सरक या पोलीस शिपायाच्याही कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ स्पष्टपणे दिसत आहे. सरक हे साध्या वेशात होते.
कोनशिलेवर नाव नाही म्हणून जिल्हाधिकाऱयाला धमकावले
कार्यक्रमाच्या कोनशिलेवर नाव टाकले नाही म्हणून आमदार कांबळे हे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्यावरही भडकले. हक्कभंग आणण्याची धमकी त्यांनी देशमुख यांना दिली. या घटनांमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
View this post on Instagram
सोशल मीडियात तीव्र प्रतिक्रिया
गुरुवारी सिल्लोड येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मिंधे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांची गुंडगिरी अवघ्या महाराष्ट्राने पाहिली. आज भाजप आमदाराने पुण्यात दादागिरी केली. सत्ता डोक्यात गेल्याचे यातून स्पष्ट होते, अशी संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. दरम्यान, सुनील कांबळे यांनी आपण कोणाच्याही कानाखाली मारली नाही, व्हायरल व्हिडीओ खोटा असल्याचा दावा केला आहे.
हा सत्तेचा माज
‘काल अब्दुल सत्तार, आज सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज. भाजप आमदाराची मस्ती इतकी की, डय़ुटीवर असलेल्या पोलिसाच्या थोबाडीत हाणली, थेट वर्दीला हात घालण्याची हिंमत सत्ताधारी आमदारामध्ये आली कशी? गृहमंत्री याची दखल घेणार का? कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबावही टाकला जाऊ शकतो…’अशी तोफ विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी डागली.


























































