
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आल्यामुळे पालिकेनेही ‘निवडणूक अंमलबजावणी आराखडा’ तयार ठेवला आहे. यावेळी लोकसंख्या वाढीमुळे नऊ प्रभाग वाढून एकूण प्रभागांची संख्या 236 होणार आहे. त्यामुळे अधिकाऱयांवर कामाचा ताण येऊ नये यासाठी 12 प्रभागांसाठी दोन निवडणूक अधिकारी नेमण्यात येणार आहेत. शिवाय गर्भवती महिलांना निवडणूक कामातून वगळण्यात येणार आहे.
मुंबईच्या वाढलेल्या लोकसंख्येनुसार पालिकेच्या नगरसेवकांची संख्या 9ने वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे पालिकेला पुन्हा एकदा सर्व प्रभागांच्या सीमा लोकसंख्येनुसार निश्चित करून राज्य निवडणूक आयोगाला कच्चा अहवाल सादर करावा लागणार आहे. यामध्ये 50 हजारांवर लोकसंख्येवर एक प्रभाग होऊ शकतो. यानुसार पालिकेने आराखडा तयार ठेवल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. दरम्यान, नगरसेवकांच्या वाढीव संख्येबाबत पालिकेला अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. मात्र पालिकेने आदेश दिल्यानंतर आठवडाभरात आठ दिवसांत कच्चा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करु, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
पालिका कर्मचाऱयांना निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये ईव्हीएम मशीन हाताळणी, प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया, मतमोजणी यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी कर्मचाऱयांना आदल्या दिवशी मतदान केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था केली जाईल.
मतदान केंद्रे, कर्मचारीही वाढणार
- मुंबईत सद्यस्थितीत कोरोना पूर्ण नियंत्रणात असला तरी पालिकेने खबरदारी म्हणून निवडणुकीचे नियोजन कोविडच्या पार्श्वभूमीवरच केले आहे.
- गर्दी टाळण्यासाठी मुंबईत गेल्या निवडणुकीत बूथची संख्या 8500वरून 11500पर्यंत वाढवण्यात येणार आहे. तर कर्मचाऱयांची संख्याही 50 हजारांवरून 70 हजारांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
- मुंबई महानगरपालिकेत सद्यस्थितीत 227 नगरसेवक आहेत. तर पाच स्वीकृत नगरसेवक आहेत. मात्र वाढलेल्या लोकसंख्येमुळे मूलभूत सोयीसुविधांसाठी नगरसेवक वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याने पालिकेतील निवडून येणाऱया नगरसेवकांची संख्या 227वरून 236वर जाणार आहे.































































