मोनो आणि मेट्रोला बेस्ट सेवा जोडा! मुंबई महानगरपालिकेची शिफारस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांचे एकत्रिकरण करण्यासाठी बेस्टचे मार्ग मोनो आणि मेट्रो स्थानकांना जोडण्यात यावेत तसेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठरावीक अंतरावर जाण्यासाठी ‘पॉइंट टू पॉइंट’ मिनी बसेस बेस्टने सुरू करव्यात अशी शिफारसी मुंबई महानगरपालिकेने बेस्ट प्रशासनाला केली आहे.

बेस्टच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी पालिकेने वीज पुरवठा आणि परिवहन सेवा देणाऱ्या उपक्रमाला अनेक सूचना केल्या आहेत. बेस्टची बस आगारे भाडेतत्त्वावर देण्याविषयी बेस्ट उपक्रमाने विचार करावा आणि तसेच केलेल्या शिफारसींचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना करावी तसेच बसेसमधून मोफत, सवलतीतून प्रवास करणाऱ्या लाभार्थ्यांवरील खर्चाचा परतावा पालिका व राज्य सरकारकडून घेण्यात यावा असेही म्हटले आहे.
शिलकीचा अर्थसंकल्प कसा करणार

बेस्टने अर्थसंकल्प तयार करताना तो एक लाख रुपये शिलकीचा न केल्याबद्दल पालिकेने तो पुन्हा बेस्टकडे पाठविला आहे. त्यावर भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी हरकत घेत सद्यस्थितीला बेस्टची आर्थिक परिस्थिती पाहता शिलकीचा अर्थसंकल्प कसा तयार करणार म्हणून हा नियम बदलण्याचीही मागणी त्यांनी केली.