मुंबईकरांची बोट मिठी नदीत धावणार; नितीन गडकरींनी शोधला रेल्वेला पर्याय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

देशभरातील 111 नद्यांमधून जलवाहतूक सुरू करू पाहणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली बोट आता मुंबईतील मिठी नदीच्या दिशेने वळवली आहे. मिठी नदी स्वच्छ केली तर त्यातून मुंबईकरांची बोट धावू शकेल आणि हा लोकल रेल्वेसाठी अत्यंत उपयुक्त पर्याय ठरेल असे गडकरी म्हणाले.

राज्य सरकार आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘मुंबई 2.0’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गडकरी बोलत होते. मुंबईकरांसाठी मिठी नदीतील वाहतूक हा उत्तम प्रवासाचा पर्याय होऊ शकतो. मात्र त्यासाठी राज्य सरकार आणि महानगरपालिकेने पहिल्यांदा ही नदी स्वच्छ करायला हवी. सेऊलमध्ये तर नाल्यातून बोट वाहतूक होते, मग मुंबईच्या मिठी नदीतून का होऊ शकणार नाही, असा सवालही गडकरी यांनी यावेळी केला. नद्यांच्या आजूबाजूला आता कोणतेही केमिकल प्रकल्प आणू नयेत, त्यांना परवानगी देऊ नये अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबईचा आत्मा हरवता कामा नये

केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी विकासाच्या नादात मुंबईचा आत्मा तर हरवत नाही ना अशी भीती व्यक्त केली. मुंबई किती जणांचा भार पेलू शकेल याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. कोणताही विकास करताना, प्रकल्प राबवताना, मुंबईला नव्याने ऊर्जा देताना या शहराचा आत्मा हरवणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असे प्रभू म्हणाले. मुंबई ‘राहण्यायोग्य’ कशी होईल याची काळजी सरकारने घ्यावी असेही ते म्हणाले. सिंगापूर, शांघाय आणि मेक्सिको ही तीन शहरे त्यांच्या देशाच्या जीडीपीमध्ये महत्त्वाचा वाटा उचलतात. मग मुंबईला आपण तसे कधी बनवणार, असा सवालही प्रभू यांनी यावेळी केला.

सीएसएमटी ते भायखळा- वडाळा आज लोकल बंद

मशीद स्थानकातील जुना पादचारी पूल पाडून नवीन पूल बांधण्यासाठी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. चारही मार्गांवर सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेचारदरम्यान तब्बल सहा तासांचा मेगाब्लॉक असेल. या काळात सीएसएमटी ते भायखळ्यादरम्यान आणि हार्बर रेल्वेमार्गावर सीएसएमटी ते वडाळ्यादरम्यान एकही लोकल धावणार नाही. यादरम्यान, सर्व अप आणि डाऊन लोकल जलद मार्गावरून चालवण्यात येतील.